---Advertisement---

MPL 2025 रायगड रॉयल्सची फायनलमध्ये रॉयल एन्ट्री, पुणेरी बाप्पा फिरकीच्या जाळ्यात अडकली

On: शनिवार, जून 21, 2025 11:20 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 चा क्वालिफायर 2 सामना शनिवारी (21 जून) खेळला गेला. रायगड रॉयल्स विरुद्ध पुणेरी बाप्पा यांच्या दरम्यान झालेल्या या सामन्यात चाहत्यांना दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळाले. अंतिम सामन्यासाठी झालेल्या या चुरशीच्या सामन्यात रायगड रॉयल्सने 134 धावांचा यशस्वी बचाव करत अंतिम फेरीत जागा निश्चित केली. रायगडचे दोन्ही फिरकीपटू शुभम कदम व विकी ओस्तवाल सामन्याचे नायक ठरले.

क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झाल्यानंतर पुणेरी बाप्पा या सामन्यासाठी मैदानात उतरले. तर, एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवून रायगड रॉयल्स यांनी क्वालिफायर दोन गाठलेली. रायगड रॉयल्सला या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. सलामीवीर विकी ओस्तवाल हा केवळ 11 धावा करून बाद झाला. त्यानंतर ओंकार खाटपे व सिद्धेश वीर यांच्या दरम्यान 37 चेंडूंमध्ये 42 धावांची संथ भागीदारी झाली. त्यानंतर पुन्हा एकदा ऋषभ राठोड आणि सिद्धेश यांनी 19 चेंडूंमध्ये केवळ 9 धावा केल्या. नीरज जोशी हा देखील केवळ पाच धावा करू शकला. तर, सिद्धेशने 40 चेंडूंमध्ये 45 धावा केल्या. तळातील फलंदाज विशेष योगदान देऊ शकले नाहीत. त्यामुळे रायगडचा डाव 133 धावांपर्यंत थांबला. पुणेरी बाप्पासाठी रामकृष्ण घोष व निकित धुमाळ यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

विजयासाठी 134 धावांच्या सोप्या लक्षाचा पाठलाग करताना मुर्तझा ट्रंकवाला व यश नाहर हे सलामीवीर अनुक्रमे 1 आणि 9 धावा काढून बाद झाले. रायगडचे फिरकीपटू विकी ओस्तवाल व शुभम कदम गोलंदाजीला आल्यावर त्यांनी पुणेरी बाप्पाच्या फलंदाजांना जखडून ठेवले. ऋषिकेश सोनवणे वगळता पुण्याच्या इतर फलंदाजांना हात खोलता आले नाहीत. तो 30 चेंडूंमध्ये 30 धावा काढून धावबाद झाला. इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या यश जाधव याला 23 चेंडूंमध्ये फक्त 14 धावा करता आल्या. अखेरी सुरज शिंदे याने 22 धावा काढून विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, निखिल कदम यांनी त्याला बाद करत पुणेरी बाप्पाच्या आशा संपुष्टात आणल्या. पुणे संघासाठी निखिल याने सर्वाधिक तीन बळी मिळवले. तर, तनय संघवी व विकी ओस्तवाल यांनी दोन फलंदाजांना माघारी पाठवले.

रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात रायगड रॉयल्सचा सामना ईगल नाशिक टायटन्सशी होईल. हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---