यूएस ओपन 2024 मध्ये गतविजेता नोवाक जोकोविचला मोठा धक्का बसला आहे. तो स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडला. जोकोविचचा ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरिननं पराभव केला. यंदाच्या यूएस ओपनमधील हा दुसरा मोठा अपसेट आहे. याआधी स्पॅनिश स्टार कार्लोस अल्कारेझही स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीतून बाहेर पडला होता.
आर्थर ॲशे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात जोकोविचला 28व्या मानंकित ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सी पोपिरिनविरुद्ध 4-6, 4-6, 6-2, 4-6 असा पराभव पत्कारावा लागला. हा सामना 1 तास 19 मिनिटं चालला. या पराभवामुळे जोकोविचचं विक्रम 25वं ग्रँडस्लॅम जिंकण्याचं स्वप्न पुन्हा भंगलं. विशेष म्हणजे, 2017 नंतर पहिल्यांदाच जोकोविच एका कॅलेंडर वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकू शकणार नाही. तो 18 वर्षांत प्रथमच यूएस ओपनच्या चौथ्या फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही.
नोवाक जोकोविच पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा टेनिसपटू आहेत. ऑस्ट्रेलियाची स्टार महिला टेनिसपटू मार्गारेट कोर्ट आणि नोवाक जोकोविच यांनी आतापर्यंत 24-24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. आता जोकोविच केवळ एक ग्रँड स्लॅम जिंकून या यादीत आघाडीवर जाईल. परंतु यावर्षी त्याचं हे स्वप्न पूर्ण झालं नाही.
नोवाक जोकोविचनं त्याच्या टेनिस कारकिर्दीत सर्वाधिक 37 वेळा ग्रँडस्लॅम एकेरीच्या फायनल खेळल्या आहेत. या बाबतीत त्यानं स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर आणि स्पॅनिश स्टार राफेल नदालला केव्हाच मागे टाकलं.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम (महिला आणि पुरुष एकेरी)
(1) नोवाक जोकोविच (पुरुष-सर्बिया) – 24 (ऑस्ट्रेलियन-10, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-4)
(2) मार्गारेट कोर्ट (महिला-ऑस्ट्रेलिया) – 24 (ऑस्ट्रेलियन-11, फ्रेंच-5, विम्बल्डन-3, यूएस-5)
(3) सेरेना विल्यम्स (महिला-अमेरिका) – 23 (ऑस्ट्रेलियन-7, फ्रेंच-3, विम्बल्डन-7, यूएस-6)
(4) राफेल नदाल (पुरुष- स्पेन) – 22 (ऑस्ट्रेलियन-2, फ्रेंच-14, विम्बल्डन-2, यूएस-4)
(5) स्टेफी ग्राफ (महिला-जर्मनी)- 22 (ऑस्ट्रेलियन-4, फ्रेंच-6, विम्बल्डन-7, यूएस-5)
(6) रॉजर फेडरर (स्वित्झर्लंड) – 20 (ऑस्ट्रेलियन-6, फ्रेंच-1, विम्बल्डन-8, यूएस-5)
सर्वाधिक ग्रँड स्लॅम फायनल (पुरुष एकेरी)
37- नोवाक जोकोविच
31- रॉजर फेडरर
30- राफेल नदाल
19- इव्हान लेंडल
18- पीट सॅम्प्रास
हेही वाचा –
भारतीय संघाला मोठा धक्का! बुची बाबू स्पर्धेत वर्ल्ड कप हिरो दुखापतग्रस्त
कसोटी क्रिकेटमध्ये खळबळ! श्रीलंकेच्या फलंदाजाची गावस्कर-ब्रॅडमन यांच्या खास क्लबमध्ये एंट्री
बांगलादेश मालिकेपूर्वी युवा फलंदाजाचं दमदार शतक, कसोटी संघासाठी ठोकला दावा