इंडियन प्रीमियर लीगच्या 19 व्या (Indian premiere league 2026) हंगामाची सुरुवात 28 मार्च रोजी गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्याने होत आहे. हा सामना आरसीबीचे होम ग्राउंड असलेल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. आरसीबीला पहिले आयपीएल जेतेपद मिळवण्यासाठी 18 वर्षे प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली, त्यामुळे आता हे जेतेपद टिकवून ठेवण्याचे सर्वात मोठे आणि कठीण आव्हान त्यांच्यासमोर असेल.
रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली आरसीबीने पहिले जेतेपद पटकावले होते आणि या हंगामातही तोच संघाची धुरा सांभाळणार आहे. सर्वांच्या नजरा विराट कोहलीवर (Virat Kohli) असतील, कारण त्याची बॅट चालली तर आरसीबीची कामगिरी उंचावणे निश्चित मानले जाते. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत केवळ दोनच संघांना आपले जेतेपद राखण्यात (Title Defend) यश आले आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK)
चेन्नईचा (CSK) संघ प्रत्येक हंगामात जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जातो आणि याचे मुख्य कारण महेंद्रसिंग धोनीचे नेतृत्व आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई आयपीएल इतिहासातील पहिला असा संघ बनला, ज्याने सलग दोन हंगाम ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईने 2010 मध्ये पहिल्यांदा जेतेपद पटकावले आणि 2011 मध्येही त्यांनी त्याची पुनरावृत्ती केली.
मुंबई इंडियन्स (MI)
चेन्नई आणि मुंबई हे आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून दोघांनीही प्रत्येकी 5 वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. मुंबईला पहिल्या जेतेपदासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागली, पण 2019 मध्ये चौथे जेतेपद पटकावल्यानंतर, 2020 मध्येही त्यांनी जेतेपद राखून पाचव्यांदा ट्रॉफीवर आपले नाव कोरले होते. आता आरसीबी हा पराक्रम करणारा तिसरा संघ ठरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.






