---Advertisement---

आयपीएल 2026 आधी दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठा बदल! ‘या’ दिग्गजाला घेतले संघात, 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडविरुद्ध…

On: गुरूवार, मार्च 19, 2026 4:12 PM
---Advertisement---

आयपीएल २०२६ चा हंगाम २८ मार्चपासून सुरु होत आहे. या हंगामाआधीच दिल्ली कॅपिटल्समध्ये मोठा बदल झाला आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत. अशातच दिल्लीच्या संघात कोणता बदल झाला हे जाणून घेऊ.
झाले असे की, फ्रॅंचायजीने त्यांच्या फिल्डींग कोचमध्ये बदल केला आहे. आयर्लंडचा माजी अष्टपैलू जॉन मूनी याला आगामी हंगामासाठी महत्वाची जबाबदारी दिली आहे. संघाने सोशल मीडियामार्फत याबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये त्याने जॉन मूनीला फिल्डींग कोच म्हणून जाहीर केले आहे.

जॉनने आयर्लंडसाठी २००६ ते २०१५ दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. त्या ९ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने ६४ वनडे आणि २७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने ५५ वनडेच्या डावांमध्ये ९६३ धावा केल्या आहेत. यामध्ये ३ अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच त्याने या प्रकारामध्ये ४८ विकेट्सही घेतल्या आहेत. टी२० मध्ये २३१ धावा केल्या असून १० विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वनडेमध्ये १९ आणि आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये १३ झेल घेतले आहेत.

२०११ च्या वनडे विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मिळवलेल्या विजयामध्ये जॉनने उत्तम कामगिरी केली होती. त्याने ९ षटकात ६३ धावा देताना इयान बेल, जोनाथन ट्रॉट, पॉल कॉलिंगवूड आणि टीम ब्रेसनन यांच्या विकेट्स घेतल्या होत्या. तसेच ३२८ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करताना आठव्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद ३३ धावा केल्या होत्या.

दिल्लीसाठी मागील हंगाम काहीसा निराशाजनक राहिला आहे. संघ पहिल्या चारमध्येही पोहोचला नव्हता. त्यामध्ये अक्षर पटेलच्या नेतृत्वात दिल्लीने १४ पैकी ७ सामने जिंकले होते. सहा सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर एक सामना अनिर्णीत राहिला.

मागील हंगामातही दिल्लीमध्ये मोठा बदल झाला होता. २०२५ चा हंगाम सुरू होण्याआधी संघाने नियमित कर्णधार रिषभ पंतला रिलीज केले होते. त्यानंतर अक्षरला नेतृत्वाची जबाबदारी दिली. त्या हंगामामध्ये पंतने लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व केले होते. तो संघही प्लेऑफसाठी पात्र ठरला नाही.

२०२६च्या हंगामात दिल्लीचा पहिला सामना लखनऊविरुद्ध आहे. हा सामना एकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ येथे १ एप्रिलला खेळला जाणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---