इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा दुसरा क्वालिफायर सामना बुधवार रोजी (१३ ऑक्टोबर) दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झाला. शारजाहच्या मैदानावर झालेल्या या लढतीत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवण्यासाठी उभय संघांनी आटोकाट प्रयत्न केले. अखेर २० व्या षटकातील पाचव्या चेंडूवर कोलकाताने ३ विकेट्स राखून सामना खिशात घातला. भलेही दिल्ली संघाला अवघ्या काही अंतराने पराभवास सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी दाखवलेल्या खेळाच्या जोरावर चाहत्यांच्या मनातील त्यांच्याप्रती असलेले प्रेम अजूनच वाढले असावे.
या सामन्यात रिषभ पंतच्या नेतृत्त्वाखालील दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला होता. कोलकाताच्या गोलंदाजीनी त्यांना १३५ धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरात कोलकाताच्या सलामीवीरांनी दिल्लीच्या गोलंदाजांना चांगलाच चोप दिला. शुबमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी मिळून पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची भागिदारी रचली. वेंकटेश वैयक्तिक ५५ धावा तर शुबमन ४६ धावांचे योगदान देऊ शकला.
परंतु या सलामीवीरांच्या विकेट गेल्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांच्या भेदकतेपुढे कोलकात्याच्या फलंदाजांची मात्र भंबेरी उडाली. कागिसो रबाडा, एन्रिच नॉर्किए आणि आर अश्विन यांनी मिळून शेवटच्या ३ षटकात चक्क ४ विकेट्स चटकावल्या. त्यातही कौतुकास्पद बाब अशी की, त्यांनी या चारही फलंदाजांना खाते न उघडता पव्हेलियनचा रस्ता दाखवला.
https://twitter.com/DelhiCapitals/status/1448353569388720130?s=20
वरची फळी बाद केल्यानंतर मधल्या फळीत यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक फलंदाजीला आला होता. परंतु डावातील अठरावे षटक टाकण्यासाठी आलेल्या कागिसो रबाडाने शेवटच्या चेंडूवर कार्तिकला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यापुढील षटक टाकण्यासाठी नॉर्किए आला होता. त्यानेही आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कोलकाताचा कर्णधार ऑयन मॉर्गनला शून्यावर त्रिफळाचीत केले. त्यानंतर अंतिम षटक टाकण्यासाठी आलेल्या अश्विनने शाकिब अल हसन आणि सुनिल नारायण यांना सलग २ चेंडूंवर बाद करत संघाला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले होते.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1448347864162205699?s=20
अशाप्रकारे दिल्लीकरांनी कोलकाताच्या हातात असलेला सामना त्यांच्यासाठी अवघड बनवला होता. त्यामुळे सामना गमावल्यानंतरही त्यांनी विजयासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मला क्रिकेट आवडत नाही…’, दिल्लीच्या पराभवानंतर युवराज सिंगच्या प्रतिक्रियेने वेधले सर्वांचेच लक्ष
सामना हारुनही दिल्लीनं जिंकली मनं! क्रिकेटविश्वातून अशा उमटल्या प्रतिक्रिया






