डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कलला भारत अ संघासाठी ऑस्ट्रेलियाचं तिकीट मिळालं होतं. परंतु रोहित शर्माची अनुपस्थिती आणि शुबमन गिलच्या दुखापतीमुळे त्याला पर्थ कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याला बॅटनं चांगली कामगिरी करता आली नाही. नंतर, रोहित आणि गिलच्या पुनरागमनामुळे त्याला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आता ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर त्याच्या बॅटमधून पुन्हा धावांचा पाऊस पडू लागला आहे.
देवदत्त पडिक्कलनं विजय हजारे ट्रॉफीच्या क्वार्टर फायनलमध्ये कर्नाटकसाठी दमदार शतक झळकावलं. वडोदरा येथील मोती बाग स्टेडियमवर बडोद्याविरुद्धच्या क्वार्टर फायनलमध्ये पडिकलनं मयंक अग्रवालसोबत सलामी करताना 99 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीनं 102 धावा केल्या. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 103.3 एवढा होता. त्याला राज लिंबानीनं बाद केलं.
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, देवदत्त पडिकलची या स्पर्धेत सरासरी 100 पेक्षा जास्त आहे. त्यानं आतापर्यंत दोन डझनहून अधिक डाव खेळले. त्याचा स्ट्राईक रेटही 95 च्या आसपास आहे. देवदत्त पडिक्कलनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये आतापर्यंत 26 डावांमध्ये एकूण 1915 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी 100.78 आणि स्ट्राईक रेट 94.47 एवढा राहिला. या स्पर्धेच्या इतिहासात त्यानं 9 शतकं आणि 11 अर्धशतकं झळकावली आहेत.
पडिक्कलनं भारतासाठी दोन कसोटी आणि दोन टी20 सामने खेळले आहेत. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो आतापर्यंत आपली छाप सोडू शकलेला नाही. कसोटीच्या 3 डावांत त्यानं 90 धावा केल्या असून टी20 मध्ये त्याच्या बॅटमधून 38 धावा आल्या आहेत. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या तीन संघांकडून खेळला आहे.
हेही वाचा –
फलंदाज की गोलंदाज…क्रिकेटमध्ये कोण आहे मालामाल?
विराट कोहलीने खरोखरच युवराज सिंगची कारकीर्द संपवली? पाहा VIDEO, काय म्हणतो युवी
“खेळाडूंची पूजा भारतीय क्रिकेटला मागे ढकलत आहे”, संजय मांजरेकरांचे खडे बोल