भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ जूनपासून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या ऐतिहासिक सामन्यापूर्वी न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून (२ जून) क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यासोबतच न्यूझीलंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आणखी एका नावाची भर पडली. सलामीवीर म्हणून डावखुरा फलंदाज डेवॉन कॉनवे याने २८१ वा खेळाडू म्हणून पदार्पण केले.
दक्षिण आफ्रिका सोडून आला न्यूझीलंडला
डेवॉन कॉनवे हा मूळचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आहे, जिथे त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज असलेला क्विंटन डी कॉक त्याचा संघ सहकारी होता. मात्र, त्यानंतर तेथे त्याला प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये जास्त संधी मिळाल्या नाही. अखेर संधीची वाट पाहत त्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला आणि ४ वर्षांपूर्वी न्यूझीलंडला आला. न्यूझीलंडमध्ये आल्यानंतर कॉनवेचे भाग्य खऱ्या अर्थाने उजळले.
वेलिंग्टन फायरबर्ड्सकडून खेळत त्याने १७ प्रथमश्रेणी सामन्यात चार शतकांसह १५९८ धावा केल्या. त्याची धावांची सरासरी ७२.६३ आहे. या काळात ३२७ धावांची नाबाद खेळी त्याने खेळली. याशिवाय वनडे आणि टी२० स्पर्धांमध्येही त्याने भरपूर धावा केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये तीन वर्षे खेळल्यानंतर त्याने न्यूझीलंड संघासाठी पदार्पण केले.
लॉर्ड्सवर पदार्पण
इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी टॉम लॅथम ११ व केन विलियम्सन ११ यांच्यादरम्यान एक सराव सामना खेळला गेला. या सामन्यात त्याने नाबाद अर्धशतक झळकावून या मालिकेसाठी आपली दावेदारी ठोकली. त्यानंतर, सुरु झालेल्या या कसोटी मालिकेत त्याने न्यूझीलंडसाठी कसोटी पदार्पण देखील केले.
लॉर्ड्स कसोटीच्या पहिल्या डावात जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड व मार्क वूड या दिग्गज वेगवान गोलंदाजांचा धीरोदात्तपणे सामना करत त्याने आत्तापर्यंत नाबाद अर्धशतक झळकावले आहे. त्याचा फॉर्म भविष्यात असाच राहिल्यास तो जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळताना दिसल्यास आश्चर्य वाटायला नको.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉर्डस कसोटीत इंग्लंडने परिधान केली काळी जर्सी, कारण वाचून तुम्हीही कराल कौतुक
आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर; विराट-रोहित या स्थानावर, तर सांघिक क्रमवारीत भारत
कमनशिबी आरसीबी! या पाच खेळाडूंना रिलीज करताच पुढच्या वर्षी त्यांनी जिंकली आयपीएल ट्रॉफी