इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून (२ जून) २ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंडवर सुरु झालेल्या पहिल्या कसोटीचा पहिलाच दिवस न्यूझीलंडचा फलंदाज डेवॉन कॉनवेने शतकी खेळी करत गाजवला आहे. याशिवाय त्याने भारताचा दिग्गज कर्णधार सौरव गांगुलीचा एक विश्वविक्रमही मोडला आहे.
पदार्पणात मोडला गांगुलीचा विक्रम
या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या सामन्यातून कसोटी पदार्पण केलेला डेवॉन कॉनवे टॉम लॅथमसह फलंदाजीला उतरला. कारकिर्दीतील पहिलाच सामना कॉनवे क्रिकेटची पंढरी समजले जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळत आहे.
त्याने पहिल्याच डावात पहिल्या दिवसाखेर नाबाद १३६ धावांची खेळी केली. ही खेळी त्याने २४० चेंडूत १६ चौकारांसह केली. त्यामुळे त्याने लॉर्ड्सवर पदार्पणाच्या कसोटी सामन्यात सर्वोच्च वैयक्तिक धावांची खेळी करण्याचा सौरव गांगुलीचा विक्रम मोडला आहे. गांगुलीनेही १९९६ साली त्याचे कसोटी पदार्पण लॉर्ड्सवर केले होते. तसेच त्याने पदार्पणाच्या सामन्यात १३१ धावांची खेळी केली होती.
जुळून आला खास योगायोग
ज्या कॉनवेने गांगुलीचा २५ वर्षे अबाधिक असलेला विक्रम मोडला त्याचा आणि गांगुलीच्या बाबतीत एक खास योगायोग जुळून आला आहे. तो योगायोग म्हणजे कॉनवे आणि गांगुली या दोघांचाही वाढदिवस ८ जुलैला असतो. कॉनवेचा जन्म ८ जुलै १९९१ रोजी झाला आहे. तर गांगुलीचा ८ जुलै १९७२ रोजी झाला आहे. म्हणजेच या दोघांमध्ये तब्बल १९ वर्षांचे अंतर आहे.
पहिल्या दिवशी न्यूझीलंडची चांगली फलंदाजी
न्यूझीलंडने पहिल्या दिवसाखेर पहिल्या डावात ३ बाद २४६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून कॉनवे व्यतिरिक्त हेन्री निकोल्सने चांगली फलंदाजी केली. तो पहिल्या दिवसाखेर १४९ चेंडूत ४६ धावांवर नाबाद आहे. तसेच टॉम लॅथमने २३ धावा केल्या. तर केन विलियम्सन आणि रॉस टेलर फार काही खास करु शकले नाहीत. विलियम्सन १३ धावांवर तर टेलर १४ धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने २ आणि जेम्स अँडरसनने १ विकेट घेतली.
महत्त्वाच्या बातम्या –
स्वारी इंग्लंडची! भारतीय खेळाडू कुटुंबाला घेऊन इंग्लंडला रवाना; विरुष्कासह मुलगी वामिका फोटोत कैद
किवी कर्णधार विलियम्सन इंग्लंडविरुद्ध पहिल्याच डावात फ्लॉप; अँडरसनने केले सुरेखरित्या क्लीनबोल्ड
असं कोण धावबाद होतं भावा!! पाहा व्हायरल होत असलेला व्हिडिओ