यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये चाहत्यांना चौकार आणि गगनचुंबी षटकारांची बरसात पाहायला मिळत आहे. या हंगामात आतापर्यंत ५ असे षटकार मारण्यात आले आहेत, जे १०० मीटरपेक्षा जास्त लांब अंतराचे आहेत. अशात या हंगामातील सर्वात लांब अंतरावरील षटकार बुधवारी (दि. १३ एप्रिल) मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात झालेल्या सामन्यात मारण्यात आला. हा षटकार मुंबईचा ‘बेबी एबी’ म्हणून ओळखला जाणारा फलंदाज डेवाल्ड ब्रेविसने मारला.
या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Bravis) मुंबई इंडियन्सकडून खेळताना एकाच षटकात २९ धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने पंजाब किंग्सचा फिरकीपटू राहुल चाहरच्या गोलंदाजीवर सलग ४ षटकारही ठोकले होते. यातील शेवटच्या षटकाराने हंगामात थेट विक्रमाला गवसणी घातली. हा षटकार ११२ मीटर लांब अंतराचा होता, जो या हंगामातील सर्वात लांब षटकार ठरला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Dewald Brevis – "Baby AB" 😍 #IPL2022 #MIvsPBKS pic.twitter.com/jSHoW0fbnk
— Ranjeet Saini (@ranjeetsaini7) April 13, 2022
ब्रेविसने मोडला लियाम लिविंगस्टोनचा विक्रम
ब्रेविसने या हंगामात सर्वात लांब षटकार मारण्याच्या बाबतीत पंजाब किंग्सच्याच लियाम लिविंगस्टोनचा (Liam Livingstone) विक्रम मोडला आहे. यापूर्वी लियामने १०८ मीटर लांब अंतराचा षटकार मारला होता. आयपीएलच्या १५व्या हंगामात सर्वात लांब षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्सचा फलंदाज शिवम दुबे (Shivam Dube) आणि पुन्हा एकदा ब्रेविसचेच नाव आहे. त्यांनी १०२ मीटर लांबीचा षटकार मारला होता.
आयपीएल २०२२मध्ये सर्वात लांब षटकार मारणारे फलंदाज
११२ मीटर- डेवाल्ड ब्रेविस (मुंबई इंडियन्स)*
१०८ मीटर- लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
१०५ मीटर- लियाम लिविंगस्टोन (पंजाब किंग्स)
१०२ मीटर- डेवाल्ड ब्रेविस (मुंबई इंडियन्स)
१०२ मीटर- शिवम दुबे (चेन्नई सुपर किंग्स)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
ब्रेविसने फिरकीपटू राहुलच्या षटकात बनवल्या होत्या २९ धावा
पंजाब किंग्सने दिलेल्या १९९ धावांचा पाठलाग करताना मुंबईने पहिल्या ८ षटकात ६३ धावांवर २ विकेट्स गमावल्या होत्या. डावातील ९वे षटक टाकण्यासाठी पंजाब संघाकडून फिरकीपटू राहुल चाहर आला होता. त्यावेळी त्याला ब्रेविसने चांगलाच चोप दिला. ब्रेविसने ५ चेंडूंवर १ चौकार आणि ४ खणखणीत षटकार मारले होते. यातील पहिल्या चेंडूवर तिलक वर्माने १ धाव घेतली होती. अशाप्रकारे राहुल चाहरच्या (Rahul Chahar) या षटकात एकूण २९ धावा मिळाल्या होत्या.
मुंबईविरुद्ध पंजाबचा १२ धावांनी विजय
पंजाबने ५ विकेट्स गमावत १९८ धावा बनवल्या होत्या. यावेळी धवनने ७० धावा आणि मयंक अगरवालने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली होती. या सामन्यासाठी मयंकलाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. प्रत्युत्तरात मुंबई संघाला ९ विकेट्स गमावत १८६ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला १२ धावांनी सामना गमवावा लागला. संघासाठी ब्रेविसने २५ चेंडूवर सर्वाधिक ४९ धावांचे योगदान दिले होते. तसेच, सूर्यकुमार यादवने ३० चेंडूत ४३ धावांचे योगदान दिले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video: जेव्हा मैदानावर तोंड पाडून बसला सूर्यकुमार, पोलार्डने असे काही करत जिंकली करोडो हृदये
चेंडू सीमापार करण्यात शिखर ‘नंबर वन’; विराट, गेल सारखे खेळाडू पडलेत मागे
रोहितवर बंदीची टांगती तलवार! मुंबई इंडियन्सची ‘ही’ एक चूक पडू शकते भलतीच महागात