पंजाब पोलिसांबरोबर काम करत असलेला लॅब्राडॉर कुत्रा(श्वान) ज्याचे नाव धोनी असे आहे तो १३ डिसेंबरला भारत विरुद्ध श्रीलंका संघांदरम्यान होणाऱ्या दुसऱ्या वनडे सामन्यानंतर निवृत्त होणार आहे.
या धोनीने मोहाली जिल्हा पोलिसांबरोबर १० वर्षे काम केलेले आहे. त्यामुळे आता त्याला निवृत्त करण्यात येणार आहे. या निम्मित एक समारंभ आयोजित केला आहे ज्यात धोनी बरोबरच पोलिस खात्यात काम केलेल्या आणखी दोन कुत्र्यांना (श्वानांना) निवृत्त करण्यात येणार आहे. त्यांनीही पोलिसांबरोबर १० वर्षे काम केले आहे.
या निवृत्तीनंतर यांना दत्तक देण्यात येणार आहे यासाठी लिलाव होईल. त्यांच्या लिलावाला ८०० रुपयांपासून सुरुवात असेल.
धोनी हा पोलीस खात्यात २००७ ला सामील झाला होता. त्याने अनेक मोठ्या प्रकरणात पोलिसांना मदत केली आहे. ज्यात ड्रग्स विक्रेते आणि स्फोटक द्रव्य शोधण्यात मदत केली आहे.
श्वान पथकाचे प्रभारी असणारे अम्रिक सिंग हे म्हणाले, ” धोनी आम्हाला पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडिअमवर तपासणी करताना साहाय्य करतो. तो २०११ विश्वचषकाच्या भारत विरुद्ध पाकिस्तान संघात झालेल्या उपांत्य सामन्यांदरम्यानही आमच्याबरोबर काम करत होता. त्यावेळी दोन्ही देशांचे पंतप्रधान आले होते.”
त्यांनी पुढे सांगितले की धोनीला दूध आणि अंडी खूप आवडतात. तो त्याच्या ३ वेळच्या जेवणात जवळजवळ २-३ लिटर दूध आणि २०-३० अंडी खातो. “त्याला दिवसभरात ६ ते ७ तास झोपायला आवडते. तो दिवसा झोपतो. तो स्फोटक द्रव्य शोधण्यात माहीर आहे. कोणतीही गोष्ट शोधण्याच्या वेळी तो चलाख कुत्रा आहे. आम्हाला त्याची आठवण येईल. आमच्यासाठी तो खूप मौल्यवान होता.”
इंडियन एक्सप्रेसच्या म्हणण्यानुसार धोनीला ३ महिन्याचा असताना अहमदनगरवरून आणले होते आणि त्याला फिल्लौर पोलिस अकॅडमीत प्रशिक्षण दिले होते.