भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आजपर्यंत अनेक मोठ-मोठे विक्रम केले आहेत. रांची सारख्या छोट्या शहरातून सुरु झालेला धोनीचा प्रवास भारताचा यशस्वी कर्णधारापर्यंत झाला. डिसेंबर २००४ ला पदार्पण केलेल्या धोनीने अनेकदा त्याच्या आक्रमक खेळीने भारताला मोठे विजय मिळवून दिले. त्याच्या खास ‘हेलिकॉप्टर शॉट’चे तर अनेक जण चाहते आहेत. पण धोनीने या शॉटचा शोध लावलेला नाही. त्याला हा शॉट त्याच्या बालपणीचा मित्र संतोष लालने शिकवला आहे.
मात्र दु:खाची गोष्ट अशी की संतोषचे जूलै २०१३ मध्ये निधन झाले. संतोष या शॉटला ‘थप्पड शॉट’ असे म्हणायचा. त्याने धोनीला काही समोस्यांच्या बदल्यात हा शॉट शिकवला होता. संतोष आणि धोनीने एकत्र झारखंडकडूनही क्रिकेट खेळले होते.
भारतीय संघात निवड झाल्यानंतरही धोनीने त्याच्या या मित्राची साथ शेवटपर्यंत सोडली नव्हती. संतोषच्या आजारपणातही धोनीने त्याची मदत केली होती. संतोषला स्वादुपिंडाचा आजार (acute pancreatitis) होता. त्यासाठी त्याला लगेचच वैद्यकिय मदत लागणार होती.
धोनी ज्यावेळी भारतीय संघाबरोबर एका दौऱ्यावर होता, तेव्हा संतोषला तातडीने उपचारांची गरज होती. त्यावेळी जेव्हा धोनीला त्याची परिस्थिती समजली. त्यावेळी त्याने तातडीने एअर अँब्यूलन्सची (हेलिकॉप्टर) व्यवस्था केली होती. जेणेकरुन संतोषला रांचीतून दिल्लीला घेऊन जाता येईल. पण दुर्दैवाने खराब वातावरण असल्याने हेलिकॉप्टर दिल्लीला पोहचण्याआधी वाराणसीमध्ये उतरवावे लागले. नंतर खूप उशीर झाला आणि त्याच्या संतोषने शेवटचा श्वास घेतला.
धोनी आणि संतोष यांच्यात असलेली मैत्री धोनीच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातही दाखवण्यात आली आहे.