आयपीएलमध्ये बुधवारी (२१ एप्रिल) डबल हेडर सामने खेळवले गेले. दिवसातील दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) आमनेसामने आले. या सामन्यात सीएसकेने दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करत केकेआरचा पराभव केला. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने आयपीएल विक्रम नोंदविला.
धोनीचा आयपीएल विक्रम
सीएसकेला तीन वेळा आयपीएल विजेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीला आयपीएल मधील यशस्वी कर्णधारांमध्ये गणले जाते. तसेच, तो आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू आहे. धोनीचा नावे आयपीएलमधील अनेक विक्रमांची नोंद असून, केकेआर विरुद्धच्या सामन्यात देखील त्याने आपल्या नावे एक मोठा विक्रम केला.
केकेआर विरुद्धच्या सामन्यात धोनीने ओएन मॉर्गनचा झेल घेताच आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे १५० बळी पूर्ण करण्याची कामगिरी केली. अशी कामगिरी करणारा तो आयपीएलमधील पहिला यष्टीरक्षक आहे. त्याच्या नावे आता ११२ झेल आणि ३९ यष्टीचीतसह १५१ बळी झाले आहेत.
या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी बुधवारी आपला २०० वा सामन्या खेळणारा दिनेश कार्तिक आहे. कार्तिकने आतापर्यंत ११२ झेल आणि ३१ यष्टीचीतसह १४३ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिसर्या स्थानी असलेल्या रॉबिन उथप्पाने यष्टीरक्षण करताना ९० फलंदाज बाद केले आहेत.
चेन्नईचा मोठा विजय
सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या ६४ आणि फाफ डू प्लेसीसच्या नाबाद ९५ धावांच्या जोरावर चेन्नईने २० षटकात २२० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात, दीपक चाहरने पहिल्या ५ षटकात ४ बळी मिळवून केकेआरची अवस्था पाच बाद ३१ अशी केली होती. मात्र, त्यानंतर आंद्रे रसेलने २२ चेंडूत ५४ आणि पॅट कमिन्सने ३४ चेंडूत नाबाद ६६ धावा बनवून सामना रंगतदार बनविला. मात्र, तो संघाला विजयी करू शकला नाही. चेन्नईने कोलकाताला १९.१ षटकात २०२ धावांवर सर्वबाद करत १८ धावांनी विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
भारतात होणाऱ्या टी२० विश्वचषकातून दक्षिण आफ्रिका संघ होऊ शकतो बाहेर, ‘हे’ आहे कारण
मोईन अलीची विकेट सुनील नारायणसाठी ठरली विक्रमी; हरभजनला मागे टाकत केला ‘हा’ विक्रम
अभिनंदन फाफ! डू प्लेसिसने टी२० कारकिर्दीत केला ‘हा’ मैलाचा दगड पार