देशाच्या काही सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक म्हणून गणल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतरही वेळोवेळी सामन्याचे नियंत्रण हातात घेऊन भूमिका बजावल्या आहेत. झारखंडमध्ये जन्मलेल्या या महान क्रिकेटपटूकडे क्रिकेटच्या खेळाचे विशेष ज्ञान आहे आणि कर्णधारपद सोडल्यानंतरही आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करून त्याने संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत.
भारतीय माजी कर्णधार सुनील गावसकर यांच्या मते विराट कोहली आणि धोनी यांचे खूप चांगले संबंध आहेत आणि दोघेही एकमेकांना खूप आदर देतात. यष्टीरक्षक असलेल्या धोनीकडे सामन्यातील काही विशेष निर्णय घेण्याचीही संधी असते.
सुनील गावस्कर म्हणाले,
“माझ्या मते यष्टीरक्षक नेहमी सर्वोत्तम स्थितीत असतो. तो खेळपट्टीचा वेग आणि गोलंदाजला ओळखून असतो. खेळपट्टी किती वळणार आहे या सर्वांबद्दल त्याला चांगले ज्ञान असते. त्यामुळे धोनी कोहलीला मार्गदर्शन करूच शकतो. कारण कर्णधार हा खेळपट्टीपासून लांब असतो. ”
” धोनी हा एक यशस्वी कर्णधार आहे. यामुळे विराटचा आत्मविश्वास मैदानावर दिसून येतो. त्यामुळे विराटला फक्त गोलंदाजांशी बोलण्याची गरज आहे आणि क्षेत्ररक्षणात थोडे फार बद्दल करण्याची गरज असते. विराटला हे समजत आहे की धोनी सुद्धा भारताला सामना जिंकून देण्याचाच प्रयत्न करत असतो.”
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा वनडे सामना २१ सप्टेंबर रोजी इडन गार्डन कोलकाता येथे होत आहे.