मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी विश्वचषकात सेमीफायनलचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाही. विश्वचषकापासून धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, अशी अशी चर्चा जोरदार होत आहे. नुकतेच धोनीचे व्यवस्थापक मिहिर दिवाकर धोनीच्या निवृत्तीबाबत नवी माहिती दिली आहे.
मिहिर दिवाकर पीटीआयशी बोलताना म्हणाले, “एमएस धोनी निवृत्तीच्या बाबतीत कोणताच विचार करत नाही. आम्ही क्रिकेटवर जास्त चर्चा करत नाही. त्याला पाहून असे वाटत नाही की तो क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारेल. तो आयपीएल खेळण्यासाठी तयारी करत होता. त्यासाठी त्याने प्रचंड मेहनत घेतली आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी तो एक महिना आधीच चेन्नईमध्ये दाखल झाला होता. टाळेबंदीच्या काळात त्याने फिटनेसकडे खूप लक्ष दिले आहे. टाळेबंदी संपल्यानंतर धोनी पुन्हा क्रिकेट सरावाला सुरुवात करणार आहे.
विश्वचषकानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौर्यावर गेला होता. मात्र धोनी आर्मी ट्रेनिंगसाठी काश्मीरला गेला होता. 14 दिवसांच्या ट्रेनिंगनंतर ही तो भारतीय संघात दाखल झाला नाही. यंदाच्या वर्षात आयपीएलमधून तो क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. कोरोना व्हायरसमुळे आयपीएलच्या स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. त्यामुळे धोनीचे क्रिकेटमधील पुनरागमन लांबणीवर पडले आहे. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून तो भारतीय संघात पुन्हा एंट्री करण्याच्या विचारात होता.