भारताचा कॅप्टनकूल एमएस धोनीने आज चेन्नई सुपर किंग्स या आयपीएल संघाला त्यांचे कोणते तीन खेळाडू परत हवे आहेत हे सांगितले आहे. यात त्याने ब्रेंडन मॅकलम,फाफ डू प्लेसिस आणि ड्वेन ब्रावो या तीन खेळाडूंची नावे घेतली आहेत. तसेच तो असेही म्हणाला आम्ही आर अश्विनलाही परत घेण्याचा प्रयत्न करू.
धोनी अश्विनविषयी म्हणाला, “मला चेन्नई सुपर किंग्समध्ये स्थानिक खेळाडू हवे आहेत. स्थानिक खेळाडू म्हणून आम्ही त्याला आयपीएल लिलावात संघात घेण्याचा प्रयत्न करू.”
धोनी पुढे म्हणाला, “आम्हाला आमचे पूर्वीचे ब्रेंडन मॅकलम,फाफ डू प्लेसिस आणि ड्वेन ब्रावो हे खेळाडू हवे आहेत. आमच्याकडे दोन राईट टू मॅच कार्ड आहेत. पण आम्हाला ते केव्हा आणि कुठे वापरायचे हे माहिती हवे.”
“अश्विनसाठी आम्ही राईट टू मॅच कार्ड वापरू शकत नाही. कारण आम्ही आधीच तीन भारतीय खेळाडू संघात कायम ठेवले आहेत. आम्हाला त्याला लिलावात विकत घ्यावा लागणार आहे. तो लिलावात पहिला असेल. पण मी सांगितल्याप्रमाणे आम्हाला वाट पाहावी लागेल. आम्ही त्याला परत घेण्याचा प्रयत्न करू.”
आयपीएलचा लिलाव २७ आणि २८ जानेवारीला होणार आहे.
चेन्नई सुपर किंग्सने धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा यांना संघात कायम ठेवले आहे. आयपीएलचा खेळाडूंना कायम करण्याचा कार्यक्रम ४ जानेवारीला पार पडला. या आधी अनेक फ्रॅन्चायझींनी धोनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. त्याविषयी धोनी म्हणाला, ” बऱ्याच लोकांनी माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता पण तुम्हाला माहितीच आहे मी चेन्नई सुपर किंग्स मध्ये परत न येण्याचा विचारच करू शकत नव्हतो.”
तो पुढे म्हणाला, “चेन्नई माझ्यासाठी दुसरे घर आहे. चेन्नईतील चाहत्यांनी मला खरंच दत्तक घेतलं आहे. त्यांनी मला त्यांचा म्हणून स्वीकारलं आहे. माझ्यासाठी यापेक्षा माझ्यासाठी मोठी प्रशंसा असू शकत नाही. हे खास ठिकाण आहे आणि मी दुसऱ्या फ्रॅन्चायझींकडे जाण्याचा विचार करू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे खूप सोपे उत्तर आहे.”