पाकिस्तानचा कर्णधार व यष्टिरक्षक सर्फराज अहमदने त्याच्या फिटनेस व फॉर्ममध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीशी चर्चा करून त्याच्याकडून सल्ला घ्यावा असे मत पाकिस्तानचे माजी कर्णधार मोहम्मद यूसुफ यांनी व्यक्त केले.
यावेळी बोलताना मोहम्मद यूसुफ असे म्हणाले की,”मला वाटते की सर्फराजला त्याच्या फिटनेस व यष्टिरक्षणाच्या कौशल्यांवर आणखी मेहनत करण्याची गरज आहे व त्यामधे सुधारणा करण्यासाठी त्याला खूप वाव आहे.”
तसेच ते पुढे असे म्हणाले की,” धोनीने भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धूरा तिन्ही प्रकारात बराच काळ सांभाळली आहे, त्याने केवळ कर्णधार म्हणून नव्हे तर फलंदाज व यष्टिरक्षक म्हणूनही ऊत्कृष्ठ कामगिरी केली आहे. सर्फराजला त्याच्या फिटनेसमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे याची जाणीव झाली आहे. तसेच त्याने यष्टिरक्षण व फलंदाजीवरही जास्तीत जास्त लक्ष्य केंद्रीत करणे अपेक्षित आहे.”
त्याचबरोबर मोहम्मद यूसुफ असे म्हणाले की सर्फराजने धोनीशी फिटनेस व फॉर्मविषयी चर्चा करण्यास काही हरकत नाही. धोनी सर्फराजला कर्णधारपदाचा व यष्टिरक्षणाचा तोल सांभाळत संघाला पुढे कसे न्यावे याविषयी उपयुक्त मार्गदर्शन करू शकतो.
धोनीच्या कर्णधार पदाचा कारकिर्दीत धोनीने भारताला एकदिवसीय विश्वचषक,चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-२० विश्वचषक व आशिया कप जिंकून दिला आहे. त्याचबरोबर त्याच्या कर्णधार पदाच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला होता.