आज हॅलो एॅप या सोशल मीडिया माध्यमावर विरेंद्र सेहवाग आपल्याला कधीही ‘बेटा बेटा होता हैं, बाप बाप होता हैं!’ असं म्हटल्याचं शोएब अख्तरने खंडन केलं आहे. तसं सेहवागने केलं असतं तर आपण त्याला नक्की उत्तर दिलं असतं असंही शोएब अख्तर हॅलोच्या लाईव्ह सेशनमध्ये म्हणाला.
तसेच सेहवाग खोटारडा असल्याचा आरोपही शोएबने केला असून असे काही केले असते तर त्याला मैदानावर जोरदार उत्तर दिले असते, असेही शोएबने यावेळी म्हटले आहे.
नक्की काय होती ती सेहवागने सांगितलेली घटना-
काही वर्षांपुर्वी विरेंद्र सेहवागने एका कार्यक्रमात ही घटना सांगितली होती. त्या कार्यक्रमाचा होस्ट शाहरुख खान होता तर भारत व पाकिस्तानचे अनेक खेळाडू समोर बसले होते. तेव्हा सेहवाग म्हणाला होता की, एका सामन्यात तो २०० धावांच्या जवळपास खेळत होता. त्या सामन्यात शोएब अख्तर गोलंदाजी करत होता. तो त्याला सतत बाऊंसर चेंडू टाकत होता. तसेच अख्तर सेहवागला सतत हुकचा फटका मार असे म्हणतं होता.
शेवटी वैतागलेल्या सेहवागने शोएबला सांगितले की नाॅन स्ट्राईकर एंडला तुझा बाप (सचिन) उभा आहे तर त्याला अशी गोलंदाजी करुन दाखवं. पुढच्या षटकात जेव्हा सचिन फलंदाजीला आला तेव्हा शोएबने बाऊंसर टाकला व सचिनने त्यावर षटकार मारला. त्यावेळी सेहवाग शोएबला म्हणाला होता की बेटा बेटा होता हैं और बाप बाप होता हैं. असे सेहवागने त्या कार्यक्रमात सांगितले होते.
सेहवागच्या या बोलण्यात तथ्य किती-
त्यानंतर कधीही भारत पाकिस्तान सामना असेल तर अनेक वेळा चाहते हा डायलाॅग बोलू लागले. अगदी यावर अनेक कर्मशिअल जाहीराती देखील आल्या. परंतु सेहवाग ते बोलला यात किती तथ्य आहे आपण या लेखात पाहुया.
वनडेत असं झालं होतं का?
अशा कोणत्याही घटनेचा चालु सामन्यातील कोणताही व्हिडीओ उपलब्ध नाही. सचिनने २००३ क्रिकेट विश्वचषकात शोएबला अतिशय अविस्मरणीय षटाकार मारला होता. परंतु तो हुकचा फटका नव्हता. तसेच त्या सामन्यात सेहवाग कधीही २००च्या आसपास खेळत नव्हता. त्या सामन्यात सेहवाग केवळ २१ धावांवर बाद झाला होता.
वनडेत सेहवागने पाकिस्तान विरुद्ध एकदा ११९ व एकदा १०८ धावा केल्या आहेत. याचा अर्थ तो कधीही २०० धावांच्या आसपास वनडेत पोहचला नव्हता. तसेच सेहवागने ११९ धावा ज्या सामन्यात केल्या त्यात सचिन खेळतंच नव्हता तसेच सेहवागने १०८ धावा केलेल्या सामन्यात सचिन केवळ ४ धावांवर बाद झाला होता. विशेष म्हणजे ११९ व १०८ धावांच्या दोनही सामन्यात शोएब अख्तर पाकिस्तान संघातच नव्हता. त्यामुळे वनडेत हा किस्सा नक्कीच झाला नसावा.
कसोटी क्रिकेटमध्ये असं काही घडलंय का?
सेहवागने पाकिस्तानविरुद्ध कसोटीत ३०९, २५४, २०१ व १७३ अशा खेळी केल्या आहेत. यातील ज्या सामन्यात सेहवागने ३०९ धावा केल्या त्यात सचिनने १९४ धावांची शानदार खेळी केली होती. परंतु आपल्या संपुर्ण खेळीत सचिनने एकही षटकार मारला नव्हता.
ज्या सामन्यात सेहवागने २५४ धावा केल्या होत्या, त्या सामन्यात त्याने ४१० धावांची शानदार भागीदारी केली होती. या सामन्यात सचिनला फलंदाजीची संधीच मिळाली नव्हती.
पाकिस्तानविरुद्ध ज्या सामन्यात सेहवागने २०१ धावा केल्या त्या सामन्यात सचिनने पहिल्या डावात ४१ तर दुसऱ्या डावात १६ धावांची खेळी करताना एकही षटकार मारला नव्हता. गमतीचा भाग म्हणजे या सामन्यात शोएब पाकिस्तान संघात खेळतच नव्हता.
पाकिस्तानविरुद्ध सेहवागने १७३ धावांची खेळी केली तेव्हा सचिनने पहिल्या डावात ९४ धावा केल्या होत्या. या धावा करतानाही सचिन एकही षटकार मारला नव्हता. तर दुसऱ्या डावात सचिनला फलंदाजी मिळाली नव्हती. या सामन्यातही शोएब पाकिस्तान संघाचा भाग नव्हता.
टी२० क्रिकेटमध्ये असं घडलंय का?
टी२० क्रिकेटमध्ये सचिन व सेहवाग केवळ एक सामना बरोबर खेळले असून तो सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळले आहेत आणि सेहवागची आंतरराष्ट्रीय टी२०मधील सर्वोत्तम धावसंख्या ६८ आहे.
त्यामुळे सेहवागच्या बोलण्यात एकतर नक्कीच तथ्य नसावे किंवा २०० धावा सांगताना भावनेच्या भरात त्या कार्यक्रमात सेहवागकडून काहीतरी चुक झाली असावी. कारण सेहवागच्या बोलण्याला दुजोरा देणारा कोणताही पुरावा नाही व अख्तरनेही याचे हॅलो लाईव्ह सेशन दरम्यान आज खंडण देखील केले आहे.