अँटिग्वा। शनिवारी (५ फेब्रुवारी) सर विवियन रिचर्ड स्टेडियम येथे १९ वर्षाखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात युवा भारतीय संघाने इंग्लंडला ४ विकेट्सने पराभूत करत विश्वचषकावर नाव कोरले. भारताकडून ४८ व्या षटकात दिनेश बाणा याने दोन खणखणीत षटकार खेचले आणि भारताचं नाव पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर लिहिले गेले. त्याच्या या षटकारांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत असून माजी कर्णधार एमएस धोनीशी त्याची तुलना होत आहे.
दिनेश बाणाचे खणखणीत षटकार
या सामन्यात इंग्लंडने भारताला १९० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग भारतीय संघाने ४७.४ षटकात १९५ धावा करत पूर्ण केला. यावेळी भारताला अखेरच्या तीन षटकात १२ धावांची गरज होती. त्यावेळी ४८ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर निशांत संधूने चौकार ठोकला आणि पुढच्या चेंडूवर एकेरी धाव काढली.
त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या यष्टीरक्षक फलंदाज दिनेश बाणाने ४८ व्या षटकाच्या तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर २ खणखणीत षटकार मारले. त्यामुळे भारताने हा सामना ४८ व्या षटकात आपल्या नावावर केला. बाणाने ५ चेंडूत नाबाद १३ धावांची खेळी केली. त्याशिवाय भारताकडून संधूने ५० आणि उपकर्णधार शेख राशिदने ५० धावांची खेळी केली. त्याचबरोबर राज बावाने ३५ धावांचे योगदान दिले.
एममएस धोनीशी तुलना
दिनेश बाणाने विजयी षटकार मारल्याने त्याची एमएस धोनीशी तुलना होत आहे. धोनीने २०११ सालच्या वरिष्ठ संघाच्यां वनडे विश्वचषकात अंतिम सामन्यामध्ये विजयी षटकार खेचला होता. धोनीचा हा षटकार आजही क्रिकेटमधील अविस्मरणीय क्षणांमध्ये गणला जातो. विशेष म्हणजे धोनी देखील यष्टीरक्षक फलंदाज आहे आणि दिनेश बाणा देखील यष्टीरक्षक फलंदाज आहे.
विशेष म्हणजे आयसीसीने देखील धोनी आणि बाणा या दोघांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात मारलेल्या विजयी षटकारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
https://www.instagram.com/p/CZnMCmOB_T3/
भारताने जिंकला पाचव्यांदा विश्वचषक
शनिवारी भारतीय संघाने पाचव्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकावर नाव कोरले आहे. यापूर्वी युवा भारतीय संघाने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ताजमहालासमोर डिविलियर्सने पत्नीला प्रपोज तर केले, पण घडलेली ‘ही’ मजेशीर गोष्ट, स्वत: एबीचाच खुलासा
क्रिकेटप्रेमी लतादीदी! सचिनच्या आई ते गावसकर-धोनीच्या ‘फॅन’