---Advertisement---

निवृत्तीनंतर दिनेश कार्तिकचं पुनरागमन, आयपीएल 2025 साठी आरसीबीनं सोपवली मोठी जबाबदारी!

---Advertisement---

टी20 विश्वचषक 2024 च्या संपल्यानंतर आता आयपीएल 2025 बाबत एक मोठा अपडेट समोर आला आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघानं आगामी आयपीएल आधी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल केला. आरसीबीनं संघाचा माजी अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती केली आहे. दिनेश कार्तिक आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी ही दुहेरी भूमिका साकारताना दिसणार आहे. कार्तिकनं आयपीएल 2024 नंतर निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर आता त्याला ही जबाबदारी मिळाली आहे.

आरसीबीनं आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवरून पोस्ट करत दिनेश कार्तिकला फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्त करण्याची माहिती शेअर केली आहे. आरसीबीनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “दिनेश कार्तिक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूमध्ये नवीन अवतारात परतला आहे. तो पुरुष संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आणि मार्गदर्शक असेल.” आयपीएल 2024 मध्ये आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर, फलंदाजी प्रशिक्षक श्रीधरन श्रीराम, गोलंदाजी प्रशिक्षक ॲडम ग्रिफिथ आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक  मालोलन रंगराजन होते.

दिनेश कार्तिकनं आयपीएल 2024 मध्ये आरसीबीसाठी जबरदस्त कामगिरी केली होती. निवृत्तीच्या घोषणेवेळी तो खूपच भावूक झाला होता. या यष्टीरक्षक फलंदाजानं 1 जून (शनिवार) रोजी त्याच्या 39 व्या वाढदिवशी निवृत्तीची घोषणा केली होती.

दिनेश कार्तिकनं नोव्हेंबर 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्यानं 5 सप्टेंबर 2004 रोजी लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. तर 1 डिसेंबर 2006 रोजी जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20 पदार्पण केलं. कार्तिक आयपीएलमध्ये 6 संघांकडून खेळला आहे.

त्यानं आयपीएलच्या 257 सामन्यात 22 अर्धशतकांसह 4842 धावा केल्या आहेत. कार्तिक आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप 10 खेळाडूंमध्ये सामील आहे. या कालावधीत त्यानं 147 झेल आणि 37 स्टंपिंगही केले आहेत. कार्तिकनं आयपीएल 2024 मध्येही दमदार कामगिरी केली आणि फिनिशरची भूमिका बजावताना 15 सामन्यांमध्ये 326 धावा केल्या होत्या.

दिनेश कार्तिकनं भारतासाठी 26 कसोटी सामन्यात 1025 धावा केल्या आहेत. तसेच त्यानं 94 एकदिवसीय सामन्यांमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करताना 1752 धावा केल्या. तर त्याच्या नावे 60 टी20 सामन्यांमध्ये 686 धावा आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

जिथे-तिथे फक्त ‘किंग’ कोहलीचीच हवा! वर्ल्डकपच्या एका पोस्टने मोडले सोशल मीडियाचे सर्व रेकाॅर्ड
पुढील टी20 विश्वचषक कधी आणि कुठे खेळला जाणार? जाणून घ्या संपूर्ण अपडेट
1983 ते 2024…विश्वचषक जिंकणाऱ्या सर्व भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, एकाचं नाव तुम्ही कधीच ऐकलं नसेल!

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---