जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक क्रिकेट लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) उर्वरित चौदावा हंगाम १९ सप्टेंबर पासून संयुक्त अरब अमिराती (युएई) येथे खेळला जाणार आहे. आयपीएलच्या या हंगामासाठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. तत्पूर्वी, भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व समालोचक म्हणून नवीन इनिंग सुरू केलेला दिनेश कार्तिक याने आयपीएलबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे.
हा सर्वात निरर्थक पुरस्कार
आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे प्रतिनिधित्व करणारा भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिक सध्या इंग्लंडमध्ये एका प्रसिद्ध वाहिनीसाठी समालोचन करत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा याच्यासोबत झालेल्या एका आभासी मुलाखतीत बोलताना कार्तिकने स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूला दिल्या जाणाऱ्या ऑरेंज कॅपविषयी वादग्रस्त विधान केले.
कार्तिक म्हणाला, “मला वाटते आयपीएलमध्ये दिली जाणारी ऑरेंज कॅप सर्वाधिक निरर्थक पुरस्कार आहे. लोकांना याबाबत विचार करावा लागेल. कायरन पोलार्ड व आंद्रे रसेल यांच्यासारखे खेळाडू हा पुरस्कार कधीही जिंकू शकत नाहीत. सलामीवीरांच्या तुलनेत त्यांच्याकडे अधिक चेंडू खेळण्याची संधी नसते. टी२० क्रिकेटमध्ये फिनिशर आणि खालच्या क्रमांकावरील फलंदाज निर्णायक भूमिका बजावतात.”
अद्याप निवृत्ती घेतली नसली तरी, दिनेश कार्तिकने जून महिन्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापासून समालोचन करण्यास सुरुवात केली आहे. सध्या तो इंग्लंडमध्ये राहून भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत समालोचन करताना दिसतोय.
या खेळाडूंना मिळाली आहे ऑरेंज कॅप
आयपीएलमध्ये प्रत्येक हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप देण्यात येते. पहिल्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबसाठी खेळणाऱ्या शॉन मार्श याने ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक तीन वेळा ऑरेंज कॅप आपल्या नावे केली आहे. स्थगित केल्या गेलेल्या आयपीएल २०२१ मध्ये सध्या दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर शिखर धवन या शर्यतीत प्रथम स्थानी असून, केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘पाऊस आला नसता तर आम्ही भारताच्या नऊच्या नऊ विकेट घेतल्या असत्या,’ कर्णधार रूटची प्रतिक्रिया
धोनीमुळे माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले; ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे वक्तव्य
विजयाची संधी हुकली तरीही कोहली अन् शास्त्री असतील खुश! कारणंही आहेत तितकीच समर्पक