रविवारी पार पडलेल्या निदाहास ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारताने बांग्लादेशवर ४ विकेट्सने मात केली. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर मारलेल्या षटकारामुळे भारताला हा विजय मिळवता आला.
निदहास ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकण्यासाठी भारताला शेवटच्या चेडूंत पाच धावांची गरज असताना दिनेश कार्तिकने षटकार मारून भारताचा विजय निश्चित केला. या षटकारामुळे दिनेश कार्तिक सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
अनेक चाहत्यांनी कार्तिकने खेळलेल्या शेवटच्या चेंडूची तुलना 2011 च्या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात धोनीने मारलेल्या षटकाराशी केली. सामन्यानंतर कार्तिकनेही एमएस धोनीला याचे श्रेय दिले.
याबद्दल कार्तिक म्हणाला,” शांत राहणे हे महत्त्वाचे आहे. माझ्यामते ही गोष्ट अनुभवातून आली. आपण ती विकत घेऊ शकत नाही किंवा वर्षभरात शिकू शकत नाही. त्यातील महेंद्रसिंग धोनी हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे. मी त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकलो. सामन्याचा शेवट हे सुद्धा मी धोनीकडूनच शिकलो.”
जेव्हा भारताला 12 चेडूंत 34 धावांची गरज होती तेव्हा दिनेश कार्तिक मैदानात उतरला. रूबेल हूसैैनने टाकलेल्या 19व्या षटकात कार्तिकने 22 धावा वसूल केल्या. यामध्ये त्याने दोन षटकार आणि दोन चाैकार मारून भारतावरचा धावांचा दबाव कमी केला.
या सामन्यात तुफानी फटकेबाजी करताना कार्तिकने ८ चेंडूंतच २९ धावा फाटकावल्या. त्याच्या अतुलनीय कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला आणि आता आगामी आयपीएल 2018 हंगामात तो कोलकाता नाइट रायडर्सचे नेतृत्व करणार आहे.