आयपीएल 2024 मध्ये सोमवारी (25 मार्च) झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्जचा 4 गडी राखून पराभव केला. बंगळुरूच्या या विजयाचा हिरो ठरला यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक! कार्तिकनं शेवटच्या षटकांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत संघाला रोमहर्षक विजय मिळवून दिला.
38 वर्षीय दिनेश कार्तिकनं पंजाब किंग्जविरुद्ध 10 चेंडूत 28 धावांची नाबाद खेळी केली. या यष्टीरक्षक फलंदाजानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि 2 षटकार मारले. या शानदार खेळीनंतर दिनेश कार्तिक सोशल मीडियावर सातत्यानं ट्रेंड करत आहे. आपल्याकडे ‘जुनं ते सोनं’ ही म्हण प्रचलित आहे. दिनेश कार्तिकनं हे सिद्ध केल्याचं क्रिकेट चाहत्यांचं मत आहे.
तसं पाहिलं तर दिनेश कार्तिकची क्रिकेट कारकीर्द रंजक राहिली आहे. सध्या तो फक्त आयपीएल सामन्यांमध्येच खेळतो. याशिवाय उर्वरित दिवसांमध्ये तो समालोचकाची भूमिका निभावतो. आता आयपीएलच्या या हंगामात हा यष्टीरक्षक फलंदाज आरसीबीसाठी फिनिशरची भूमिका उत्तमरित्या पार पाडत आहे.
कालच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला पंजाब किंग्जविरुद्ध 20 षटकांत 177 धावा करायच्या होत्या. 130 धावांवर आरसीबीचे 6 फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र त्यानंतर दिनेश कार्तिकनं युवा महिपाल लोमरोर (8 चेंडूत 17 धावा) सोबत मिळून संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेलं. या दोघांमध्ये सातव्या विकेटसाठी 18 चेंडूत नाबाद 48 धावांची भागिदारी झाली, जिनं आरसीबीला आयपीएल 2024 मधील आपला पहिला विजय मिळवून दिला.
दिनेश कार्तिकच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली तर, त्यानं 2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पण केलं. आयपीएलच्या 244 सामन्यांमध्ये कार्तिकनं 4582 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 133.24 आणि सरासरी 26.18 एवढी राहिली. 97 ही दिनेश कार्तिकची या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे. तो आयपीएलमध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स (आधीची दिल्ली डेअरडेव्हिल्स), पंजाब किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, गुजरात लॉयन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विराट कोहलीनं सॅम करनकडून हिसकावली ऑरेंज कॅप, ‘या’ गोलंदाजाकडे पर्पल कॅपचा ताबा
IPL 2024 मध्ये आज दोन नव्या कर्णधारांची झुंज, ऋतुराज गायकवाड समोर शुबमन गिलचं आव्हान
विराट कोहलीनं रचला आणखी एक इतिहास, सुरेश रैनाचा जुना विक्रम मोडला