श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू आणि राजस्थान रॉयल्सचा क्रिकेट संचालक कुमार संगकारा यानं माजी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचा टी20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फिनिशर म्हणून वर्णन केलं आहे. 39 वर्षीय कार्तिकनं यावर्षी जूनमध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता तो 9 जानेवारी ते 8 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सहभागी होणारा पहिला भारतीय ठरला आहे.
दिनेश कार्तिकनं टी20 क्रिकेटच्या 401 सामन्यांमध्ये 136.96 च्या स्ट्राइक रेटनं 7407 धावा केल्या आहेत. तो या वर्षी आयपीएलमध्ये आरसीबीसाठी शेवटचा खेळला होता. तेथे त्यानं 14 सामन्यांमध्ये 187.36 च्या स्ट्राइक रेटनं 326 धावा करून संघाला प्लेऑफमध्ये पोहचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
संगकारा पुढे म्हणाला, “दिनेश कार्तिक डावाच्या शेवटच्या टप्प्यात चमकदार कामगिरी करतो. तो टी20 क्रिकेटमधील जगातील सर्वोत्तम फिनिशरपैकी एक आहे. त्याची उपस्थिती आणि अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे. जोसच्या (जोस बटलर) जाण्यानंतर, जो सहसा वरच्या फळीत चमकदार कामगिरी करतो, आम्ही दोन वेगवेगळ्या खेळाडूंना जबाबदारी विभाजित करण्यात यशस्वी ठरलो आहे. ते तितकेच सक्षम आणि स्फोटक आहेत, असं मला वाटतं. आमच्याकडे गेल्या वेळेपेक्षा जास्त चांगलं संतुलन आहे.”
दिनेश कार्तिक भारतासाठी दीर्घकाळ क्रिकेट खेळला. तो 2007 टी20 विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या भारतीय संघाचा सदस्य होता. त्यानं सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 180 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं. तो आता दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये पार्ल रॉयल्स संघाकडून खेळणार आहे. संघ स्पर्धेतील आपला पहिला सामना 11 जानेवारी रोजी सनरायझर्स इस्टर्न केप विरुद्ध खेळेल.
हेही वाचा –
टीम इंडियाचा फुसका बार! विश्वचषकात नोंदल्या गेला लाजिरवाणा रेकॉर्ड
‘आता आमच्यासाठी…’, न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर काय म्हणाली?
न्यूझीलंडविरुद्धचा हा पराभव भारताला भारी पडणार? टीम इंडियाची पुढील वाट खुपचं खडतर