काल निदाहास ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला बांग्लादेशविरुद्ध विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारतीय संघाचे आणि कार्तिकचे सर्वच स्थरातून कौतुक करण्यात आले.
पण तरीही एका कारणावरून काल कार्तिक कर्णधार रोहित शर्मावर नाराज होता. रोहितने काल विजय शंकरला ६ व्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले आणि दिनेश कार्तिकला ७ व्या क्रमांकावर पाठवले. याच कारणामुळे काल कार्तिक नाराज झाला होता. तसेच काल मधल्या फळीत मनीष पांडे आणि शंकरला धावगती नियंत्रित ठेवण्यातही अपयश आले.
याबद्दल स्वतः कर्णधार रोहितने सामना संपल्यानंतर सांगितले. तसेच त्याने कार्तिकला ७ व्या क्रमांकावर का पाठवले याचे कारणही सांगताना तो म्हणाला, “मी त्याला सांगितले की, मला तुला फलंदाजी द्यायची आहे आणि मला असे वाटते की तू सामना संपवावा. कारण तुझ्याकडे असे कौशल्य आहेत. ज्यांची शेवटच्या तीन ते चार षटकात गरज आहे.”
“दिनेश संघासाठी हे करू शकत होता. हे एकच कारण होते की ज्यामुळे त्याला १३ व्या षटकात ६ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले नाही. पण त्यामुळे तो थोडा नाराज होता. आता तो खुश असेल ज्याप्रकारे त्याने सामना संपवला आहे. आज त्याने जे केले त्यामुळे त्याच्यामध्ये चांगला आत्मविश्वास आला असेल.”
काल अखेर कार्तिकनेच शेवटच्या दोन षटकात आक्रमक खेळत भारताला विजय मिळवून दिला. त्याच्या ८ चेंडूत नाबाद २९ धावा भारताच्या विजयात महत्वपूर्ण ठरल्या. तसेच त्याने त्याच्या या खेळीच्या जोरावर सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.