केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी शुक्रवारी (१९ नोव्हेंबर) न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी२० सामन्यात शतकी भागीदारी करत भारताला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांच्या भागीदारीमुळे भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७ गडी राखून पराभव करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. आता मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना रविवारी (२१ नोव्हेंबर) होणार आहे. भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने भारतीय संघाची सलामीची जोडी म्हणून केएल राहुल आणि रोहित शर्मावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. या सलामी जोडीने पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून खेळावे, असे त्याचे मत आहे. यासोबतच त्याने एक वक्तव्य देखील केले आहे.
भारतीय संघाची सलामीची जोडी म्हणून केएल राहुल आणि रोहित शर्मा हे अगदी योग्य आहेत. यासोबतच भारतीय संघाला तिसरा आणि निर्णायक सलामीवीर शोधण्यावर भर द्यावा लागेल, असे दिनेश कार्तिकने म्हटले आहे. रोहित किंवा लोकेश राहुल जखमी झाल्यावर त्याला फलंदाजी करावी लागेल. तेव्हा तिसरा सलामीवीर संघात असणे आवश्यक आहे. भारताला संघात तीनपेक्षा जास्त सलामीवीरांची गरज नाही, असेही कार्तिकने म्हटले आहे. एका संभाषणात कार्तिक म्हणाला, ‘माझ्या मनात रोहित आणि राहुल हे सलामीसाठी पहिले पर्याय आहेत. त्यांनी एक गोष्ट शोधून काढली पाहिजे, ती म्हणजे विश्वचषकात या दोघांपैकी एकाला दुखापत झाली तर तिसरा सलामीवीर संघासाठी लागेल, जो त्यांची जागा भरून काढेल. मला वाटत नाही की भारतीय संघात तीनपेक्षा जास्त सलामीवीरांची गरज आहे.’
दिनेश कार्तिकने सलामीसाठी चांगल्या पर्यायांची नावे देखील दिली आहेत. तो म्हणाला, ‘तुम्ही डाव्या हाताच्या फलंदाज शोधत असाल तर इशान किशन, व्यंकटेश अय्यर किंवा शिखर धवन आहेत. याशिवाय ऋतुराज गायकवाड हा चांगला पर्याय आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात सलामीला कोणाला तरी संधी मिळावी जेणेकरुन भारतीय संघ आपल्या तिसऱ्या सलामीवीरावर लक्ष केंद्रित करू शकेल.’