भारतीय क्रिकेटचा नवा हंगाम पुढील महिन्यात सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी स्पर्धेपासून सुरू होईल. त्यासाठी सर्व संघांनी सरावाद्वारे कंबर कसली आहे. आयपीएल २०२१ च्या लिलावाच्या दृष्टिकोनातून या स्पर्धेचे महत्त्व वाढले आहे. या स्पर्धेसाठी तमिळनाडूने अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याच्याकडे संघाचे नेतृत्त्व सोपवले, तर विजय शंकरला उपकर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
मुरली विजयने घेतली आहे माघार
अनुभवी सलामीवीर मुरली विजयच्या रूपाने स्पर्धा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच तमिळनाडू संघाला मोठा धक्का बसला. मुरली विजय वैयक्तिक कारणास्तव स्पर्धेतून बाहेर पडला आहे. काही दिवसांपूर्वी या स्पर्धेसाठी तमिळनाडूच्या २६ संभाव्य खेळाडूंची घोषणा करण्यात आली होती. कार्तिक व्यतिरिक्त विजय शंकर, संदीप वॉरियर, एन जगदीशन, बी अपराजित या अनुभवी खेळाडूंचा तमिळनाडू संघात समावेश आहे.
एकीकडे मुरली विजयने स्पर्धेतून माघार घेतली असताना, दुसरीकडे वेगवान गोलंदाज के. विघ्नेश कोरोना पॉझिटिव्ह सापडला. त्यामुळे मुरली विजय व विघ्नेश यांच्या जागी अनुक्रमे सूर्यप्रकाश व जगन्नाथ सिनिवास यांना संभाव्य संघात स्थान देण्यात आले.
जैव-सुरक्षित वातावरणात खेळवली जाईल स्पर्धा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी १० ते ३१ जानेवारी दरम्यान सहा वेगवेगळ्या मैदानावर खेळली जाईल. या सर्व ठिकाणी जैव-सुरक्षित वातावरण तयार केले जाणार आहे. सहभागी संघांना २ जानेवारी रोजी आपआपल्या जैव-सुरक्षित वातावरणापर्यंत पोहोचणे अनिवार्य राहील. १० जानेवारी २०२१ पासून सुरू होणाऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी अहमदाबाद येथील नव्या मोटेरा स्टेडियमवर ३१ जानेवारी २०२१ रोजी खेळली जाईल.
श्रीसंत असेल स्पर्धेचे आकर्षण
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे निलंबित झालेला श्रीसंत या स्पर्धेद्वारे पुनरागमन करण्याची शक्यता आहे. केरळ क्रिकेट संघटनेने त्याचा समावेश संभाव्य संघात केला होता. नुकताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला सुरेश रैना देखील या स्पर्धेत सहभागी होईल. तसेच, भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा नियमित सदस्य असलेला श्रेयस अय्यर दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी भारतीय दिग्गजाने निवडला भारत- ऑस्ट्रेलियाचा संयुक्त कसोटी संघ; विराटला दिला डच्चू
‘या’ सामन्यात माजी कर्णधार सौरव गांगुली पुन्हा एकदा दिसणार मैदानात चौकार- षटकार ठोकताना