पुणे १७ मे २०२२ – यजमान नाशिकचे आव्हान २-० असे सहज परतवून लावत पुणे जिल्हा फुटबॉल संघाने जिल्हा अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
नाशिक येथील मीनाताई ठाकरे मैदानावर सुरु असलेल्या या १७ वर्षांखालील गटाच्या स्पर्धेत मंगळवारी पुण्याने दोन्ही सत्रात एकेक गोल केला.
पूर्वार्धात २३व्या मिनिटाला रोशनी पंडित हिने पुण्याचा पहिला गोल केला. विश्रांतीला पुण्याने ही आघाडी कायम राखली होती. उत्तरार्धात खेळायला सुरवात झाली तेव्हा पुण्याने आपले वर्चस्व कायम राखले. सामन्याच्या ३८व्या मिनिटाला पूर्वा गायकवाड हिने दुसरा गोल केला.
विजेतेपदासाठी त्यांची गाठ आता कोल्हापूरशी पडेल. कोल्हापूरने मुंबईचा २-० असा पराभव केला.
पहिल्या सामन्यात हिंगोलीचा धुव्वा उडवल्यावर पुण्याला ठाण्यावर वियजय मिळविताना संघर्ष करावा लागला होता. उपांत्य फेरीत मात्र त्यांनी ही चूक केली नाही. निर्विवाद वर्चस्वासह त्यांनी विजयाला गवसणी घातली.