पुणे । सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठान व आर्य क्रीडोद्धारक मंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन स. प. महाविद्यालायाच्या मैदानावर १३ ते १५ नोव्हेंबर दरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धेचे हे २४ वे वर्ष असून व्हॉलीबॉल या खेळाच्या प्रचारासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते.
स्पर्धेतील लढती १३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून सुरु होणार असून स्पर्धेचा उदघाटन समारंभ सायंकाळी साडे-सहा वाजता बँक ऑफ महाराष्ट्रचे सरव्यवस्थापक प्रशांत खटावकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विनायक बापट, प्रसाद हसबनीस, देविदास जाधव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सखाराम मोरे क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिनेश मोरे व सचिव श्री. संदीप उत्तेकर यांनी दिली.
ही स्पर्धा १४ व १७ वर्षांखालील मुले व मुली अशा गटात घेण्यात येते. यावर्षी स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांच्या गटात १८, मुलींच्या गटात १७ संघांचा तर, १७ वर्षांखालील मुलांच्या गटात १०, मुलींच्या गटात ११ संघांचा समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत यावर्षी साईराज बांदल, प्रणव साळुंखे, ओंकार बालगुडे, पृथ्वीराज वाकणकर, किशोर गायकवाड हे राष्ट्रीय खेळाडू सहभागी होत आहेत. गतवर्षी झालेल्या स्पर्धेत १४ व १७ वर्षांखालील गटात मिळून ५८ संघ सहभागी झाले होते. सार्थक कड, कहान दांडेकर, अर्णव बरमेचा, हर्षद परदेशी, आर्या देशमुख, ऋजुल मोरे, अदिती भिलारे या राष्ट्रीय खेळाडूंनी गतवर्षीची स्पर्धा गाजविली.
महत्त्वाच्या बातम्या:
–असा पराक्रम करणारा कोहली ठरला केवळ चौथा भारतीय
–भारताच्या या बॅडमिंटनपटूचे मतदार यादीतून नाव झाले गायब