पुणे: कै. स्वप्निल जयंत सोमण यांच्या जन्मस्मृतीदिनानिमित्त पुणे जिल्हा अॅमॅच्युअर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या मान्यतेने जिल्हास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन सोमणस् हेल्थ क्लबतर्फे करण्यात आले आहे.
पुरुष आणि महिलांच्या ज्युनियर, सिनियर आणि मास्टर या गटात स्पर्धा होणार आहेत. पुढील महिन्यात १ते ३ जून दरम्यान सिंधुदुर्ग, कुडाळ येथे होणाºया राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेसाठी पुणे जिल्हा संघाची निवड या स्पर्धेतून करण्यात येणार आहे.
रविवार, दिनांक २९ एप्रिल रोजी बाजीराव रस्त्यावरील नू.म.वि. प्रशालेत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती सोमणस् हेल्थ क्लबचे प्रमुख राजहंस मेहेंदळे यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन नू.म.वि. शाळेच्या मुख्याध्यापिका संजिवनी ओमासे आणि गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई यांच्या उपस्थित राहणार आहेत.
पुणे शहर तसेच पिंपरी-चिंचवड,वडगाव मावळ या ठिकाणाहून ६० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. सोमणस् हेल्थ क्लब, शिवदुर्ग व्यायामशाळा, मल्टिफीट, महाराष्ट्र स्पोर्टस् क्लब, फिशर क्लब, आझम स्पोर्टस् क्लब यासोबतच पुण्यातील विविध व्यायामशाळेचे स्पर्धक स्पर्धेत सहभागी होतील. स्पर्धेचे यंदा ३ रे वर्ष आहे.
राजहंस मेहेंदळे म्हणाले, “महिला गटात ४३ ते ८५ किलो दरम्यानचे वजनी गट तर पुरुष गटात ५३ पासून १२० किलोच्या पुढील वजनीगट असणार आहेत. सर्व वयोगट आणि वजनीगटात स्कॉट, बेंचप्रेस आणि डेड लिफ्ट या प्रकारात मिळून जास्तीत जास्त वजने उचलणारे खेळाडू सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाचे मानकरी ठरणार आहेत.
याबरोबरच बेहमन फिशर स्ट्राँग वुमन आणि बेहमन फिशर ट्राँग मॅन हे किताब देखील दिले जाणार आहेत. एकूण मिळालेली पदके आणि गुणांनुसार विजेत्या संघास ट्रॉफी देण्यात येईल.”