महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025 स्पर्धेतील पाचवा सामना रत्नागिरी जेट्स विरुद्ध पीबीजी कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यान खेळला गेला. दुपारच्या सत्रात झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाचा अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर याने आपल्या फलंदाजीने क्रिकेटप्रेमींचा पैसा वसूल केला. त्याने एकाच षटकात सलग पाच षटकार खेचून एक नवा पराक्रम केला.
गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. मात्र, त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज केवळ चार धावांमध्ये माघारी परतले. संघ अडचणीत असताना कर्णधार अझीम काझी व दिव्यांग हिंगणेकर यांनी जबाबदारी उचलली. दोघांनी कोणतेही दडपण न घेता आक्रमक फटकेबाजी सुरू ठेवली.
रत्नागिरीच्या डावातील अकरावे षटक टाकण्यासाठी कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार राहुल त्रिपाठी याने डावखुरा फिरकीपटू अथर्व डाकवे याच्या हाती चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर दिव्यांग हिंगणेकर याने लॉंग ऑफला षटकार मारला. त्यानंतर दुसरा षटकार देखील त्याने त्याच ठिकाणी मारत सलग दोन षटकार वसूल केले. पुढील दोन चेंडूवर मिडविकेटच्या दिशेने त्याने चेंडू सीमापार भिरकावले. तर, पाचव्या चेंडूवर समोरच्या दिशेने षटकार मारत त्याने तीस धावा वसूल केल्या. अखेरच्या चेंडूवर दिव्यांग केवळ एकच धाव बनवू शकला. त्यामुळे षटकात सलग सहा षटकार मारण्याचा विक्रम करण्याची त्याची संधी हुकली. बाद होण्यापूर्वी त्याने 26 चेंडूंमध्ये 58 धावा केल्या.
एमपीएल 2024 मध्ये दिव्यांग हिंगणेकर याच्याच षटकात ईगल नाशिक टायटन्सचा फलंदाज धनराज शिंदे याने सलग पाच षटकार मारले होते. त्यानंतर आता दिव्यांगनेही तशीच कामगिरी करून दाखवली आहे.