चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांमध्ये इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) १५व्या हंगामातील पहिला सामना शनिवारी (२६ मार्च) वानखेडे स्टेडिअम येथे पार पडला. आयपीएल २०२२चा पहिलाय सामना जिंकण्याचा मान कोलकाताने पटकावला. चेन्नईने दिलेले आव्हान कोलकाताने ६ विकेट्स राखत पूर्ण केले आणि सामना खिशात घातला. मात्र, या सामन्यादरम्यान चेन्नईचा अनुभवी खेळाडू ड्वेन ब्रावोच्या शानदार डान्सने सर्वांचे लक्ष वेधले.
झाले असे की, चेन्नईने (Chennai Super Kings) दिलेल्या १३२ धावांचा पाठलाग करताना कोलकाता संघाला १०व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर दुसरा झटका बसला. हे षटक चेन्नईचा गोलंदाज ड्वेन ब्रावो (Dwayne Bravo) टाकत होता, तर कोलकाताकडून (Kolkata Knight Riders) नितीश राणा (Nitish Rana) फलंदाजी करत होता. ब्रावोने १०व्या षटकाचा शेवटचा चेंडू टाकला आणि राणाने तो मारला. मात्र, त्याने खेळलेला चेंडू थेट चेन्नईचा क्षेत्ररक्षक अंबाती रायुडूच्या (Ambati Rayudu) हातात गेला. ही विकेट घेताच ब्रावोने नुकत्याच प्रदर्शित झालेले आपले गाणे ‘नंबर वन’वर डान्स केला. त्याने वेंकटेश अय्यरचीदेखील विकेट घेतली. तसेच, दोघांनाही तंबूत धाडल्यानंतर ब्रावोने हा डान्स करत विकेटचे सेलिब्रेशन केले.
New season! New celebrations from @DJBravo47 ????????#TATAIPL #CSKvKKR pic.twitter.com/AbhLq5rj8h
— IndianPremierLeague (@IPL) March 26, 2022
ब्रावोचे ‘नंबर वन’ नवीन गाणे प्रदर्शित
चेन्नईचा अष्टपैलू ड्वेन ब्रावोने आयपीएलपूर्वी (IPL) आपले नवीन गाणे ‘नंबर वन’ (Number One) प्रदर्शित केले आहे. ब्रावोने हे गाणे कॉलिन वेडरबर्नसोबत मिळून लिहिले आहे. आपल्या गाण्याबाबत ब्रावो म्हणाला होता की, “हे गाणे माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे. डान्स नंबर असण्याव्यतिरिक्त माझे अधिकतर गाण्यांना विशेष महत्त्व असते. मी आपल्या या गाण्याला माझं दुसरं घर असलेल्या भारतात प्रदर्शित करण्यासाठी खूप उत्साहित आहे. हे माझ्या चाहत्यांना खूप आवडणार आहे.”
ब्रावो बनला आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू
चेन्नईकडून गोलंदाजी करताना ब्रावोने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. दुसरीकडे, मिचेल सँटनरलाही एक विकेट मिळाली. यासोबतच ब्रावोने आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगाच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर प्रत्येकी १७० विकेट्स आहेत. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारतीय फिरकीपटू अमित मिश्राचे नाव आहे. त्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीत १६६ विकेट्स घेतल्या आहेत.
कोलकाताने चेन्नईचा केला ६ विकेट्सने पराभव
आयपीएल २०२२च्या पहिल्याच सामन्यात कोलकाताने चेन्नईला ६ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात नाणेफेक जिंकून कोलकाताने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीच्या (MS Dhoni) नाबाद ५० धावांच्या जोरावर निर्धारित २० षटकात ५ विकेट्स गमावत १३१ धावा ठोकल्या होत्या. हे आव्हान कोलकाताने १८.३ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. या वेळी कोलकाताकडून अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४४ धावा ठोकल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
लाईव्ह आयपीएल सामन्यादरम्यान जागे झाले धोनीचे फुटबॉल प्रेम, सोशल मीडियावर Video होतोय व्हायरल
ड्वेन ब्रावो बनला ‘नंबर १’, आयपीएलमधील मोठ्या विक्रमात लसिथ मलिंगाशी साधली बरोबरी
विराटने ६ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ