हाॅकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांना ओळखले जाते. तर आजपर्यंतचे सर्वात महान क्रिकेटपटू म्हणून सर डाॅन ब्रॅडमन यांना ओळखले जाते. मंगळवारी (दि. 29 ऑगस्ट) ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे. त्याच निमित्ताने या 2 दिग्गजांच्या भेटीच्या एका रोमांचक आठवणीला उजाळा देऊयात…
दोन खेळातील हे दोन दिग्गज 2 मे 1935 रोजी पूर्ण कारकिर्दीत केवळ एकदाच एकमेकांना भेटले. ऍडलेडला ही ऐतिहासिक भेट झाली होती. दुर्दैवाने त्या भेटीचा केवळ त्या दोन दिग्गजांचा कोणताही फोटो आज उपलब्ध नाही.
पंकज गुप्ता, जे 1936च्या बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारतीय हाॅकी संघाचे मॅनेजर होते त्यांच्या मते, अनेक लोकं हे ध्यानचंद यांना हाॅकीतील सर डाॅन ब्रॅडमन म्हणतात. परंतु ब्रॅडमन यांनाच क्रिकेटचे ध्यानचंद म्हटले पाहिजे. कारण ब्रॅडमन यांची तुलना तरी क्रिकेटमधील अन्य खेळाडूंशी केली जाते. परंतु ध्यानचंद यांची तुलना हाॅकीमधील कोणत्याच खेळाडूशी होत नाही.
भारतीय हाॅकी संघाने 1936 बर्लिन ऑलिंपिक आधी ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडचा दौरा केला होता. पहिला सामना अपेक्षेप्रमाणे पर्थवर झाला. यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने सुरुवातीला चांगलीच फाईट दिली. 2-3 असे ते एकवेळ पिछाडीवर होते परंतु भारताने हा सामना पुढे 11-2 असा जिंकला. यात एकट्या ध्यानचंद यांनी 6 गोल केले होते.
त्यानंतर याच मालिकेतील एक सामना ऍडलेड ओव्हल येथे आयोजित केला होता. या सामन्यावेळी ध्यानचंद यांना सर डाॅन ब्रॅडमन यांना भेटण्याची इच्छा होती. तशी इच्छा त्यांनी मॅनेजर गुप्ता यांच्याकडे व्यक्त केली.
यावेळी गुप्ता यांनी सर जोनाथन क्लेन जे ऍडलेडचे प्रमुख होते यांना एक गळ घातली की सामन्यावेळी ब्रॅडमन मैदानावर असावेत.
परंतु त्याआधीच ब्रॅडमन यांनी येथील टाऊन हाॅलला भेट दिली. तसेच भारतीय संघासोबत एक फोटोही काढला. त्यांनी यावेळी भारतीय संघाचे जोरदार कौतुकही केले. “मला भारतीय संघाचे तसेच खेळाडूंचे स्वागत करताना आनंद होत आहे. कारण भारत एक जबरदस्त संघ आहे आणि आमच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावर शक्तीशाली आहे. आमच्या संघाला या संघाकडून शिकण्याची मोठी संधी आहे. ”
यावेळी भारतीय संघाचे मॅनेजर म्हणाले, “आम्ही जगात हाॅकीत अव्वल स्थानी आहोत तर तुम्ही क्रिकेटमध्ये अव्वल स्थानी आहात. हाॅकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांना क्रिकेटचे जादुगर सर डाॅन ब्रॅडमन यांना भेटायच आहे.”
त्यानंतर अॅडलेडमधील एका वृत्तपत्रानुसार हे दोन दिग्गज एकमेकांना भेटले तसेच त्यांनी एकमेकांशी हात मिळवले. यावेळी ब्रॅडमन यांनी ध्यानचंद यांच्यासाठी ते ऐतिहासिक शब्द वापरले. “तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता.”
त्या दिवसापुर्वी ब्रॅडमन यांनी कधीही हाॅकी सामना प्रत्यक्ष मैदानात जाऊन पाहिला नव्हता. याच ऍडलेड सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 10-1 असे पराभूत केले. मध्यांतरानंतर भारतीय संघ 7-0 असा आघाडीवर होता. या सामन्यात ध्यानचंद यांनी एकुण 2 गोल केले होते.
नंतर ध्यानचंद यांनी ही भेट माझ्या जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले होते. बर्लिन ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणे आणि ब्रॅडमन यांना भेटणे ह्या माझ्या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी असल्याचे ते म्हटले होते.
हेही वाचलंच पाहिजे-
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारलेली चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी
‘पाकिस्तानचा संघ भारतापेक्षा खूपच भारी, रोहित-विराटची तर…’, पाकिस्तानी क्रिकेटरचे बडेबोल