मुंबई | भारतीय संघाचा माजी कर्णधार विरेंद्र सेहवागने आज अनेक धक्कादायक खूलासे केले आहेत. त्यातील गांगूली-चॅपेल वादावरही त्याने टिपण्णी केली आहे.
परंतू याचबरोबर माजी प्रशिक्षक जाॅन राईट आणि सौरव गांगुली यांच्यामूळे आपली कारकिर्द चांगली झाल्याचेही त्याने सांगितले.
“२००२ला इंग्लंड दौऱ्यावर असताना मला माजी प्रशिक्षक जाॅन राईट आणि कर्णधार सौरव गांगुलीने सलामीला फलंदाजी करायला सांगितले. तेव्हा मी त्यांना ‘मीच का’ असा प्रश्न केला. यावर गांगूली म्हणाला की ‘तू वनडेत सलामीला फलंदाजी केली आहेस आणि तूला चांगला अनूभव आहे.’ त्यावर मी दादाला म्हणालो, ‘सचिन तर दशकापासून सलामीला येत आहे आणि तू पण १९९८ला सलामीवीर म्हणून सुरूवात केली होतीस, त्यामूळे तूम्हीच का सलामीला जात नाही आणि मी मधल्या फळीत खेळतो?’ ” असे सेहवाग म्हणाला.
यावर गांगूलीने त्याला चांगलेच खडसावले. “तुला जर कसोटीत खेळायचे असेल तर एवढी एकच जागा आहे. प्रश्न विचारू नकोस. तुला जमत असेल तर सांग नाहीतर राखीवमध्ये बसं. ” असे गांगूली तेव्हा सेहवागला म्हटल्याचे त्याने सांगितले.
यावर सेहवागने गांगूलीकडून एक वचन घेतले की मी जर सलामीवीर म्हणून मी जर अपयशी ठरलो तर मला संघातून बाहेरचा रस्ता न दाखवता मधल्या फळीत कायम करावे. त्यावर गांगुलीने त्याची ही गोष्ट ऐकली आणि पुढे सेहवाग जगासाठी एक स्फोटक सलामीवीर म्हणून ओळख निर्माण करू शकला.