आर्य सेवा मंडळाने मुंबई शहर कबड्डी असो.च्या मान्यतेने आयोजित केलेल्या महिला गट कबड्डी स्पर्धेत डॉ. शिरोडकरने अमरहिंदचा ४०-३८ असा पराभव करीत रोख रु. ५,०००/- (₹ पाच हजार) व आर्य चषकावर आपले नाव कोरले. पराभूत अमरहिंद संघला चषक व रोख रु ३,०००/-(₹ तीन हजार) वर समाधान मानावे लागले. डॉ. शिरोडकर संघाची धनश्री पोटले स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरली. तिला रोख रु.२,०००/- देऊन गौरविण्यात आले.
ताडदेव येथील आर्य नगरात गेली तीन दिवस सुरू असलेल्या स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. या शेवटच्या दिवसाच्या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या खेळाडूंनी क्रीडा रसिकांची मने जिंकली. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने सामना चुरशीचा झाला. विश्रांतीला १८-१६अशी अवघ्या २गुणांची आघाडी डॉ. शिरोडकर संघाकडे होती.
उत्तरार्धात सामन्यातील चुरस अधिक वाढत गेली. पण मध्यांतराला घेतलेली २गुणांची आघाडी डॉ. शिरोडकर संघाच्या कामी आली. या २गुणांमुळे डॉ शिरोडकर संघाने बाजी मारली. धनश्री पोटले, स्नेहा गुप्ता, साक्षी पवार, सेजल जाधव यांच्या उत्कृष्ट चढाई-पकडीच्या खेळला या विजयाचे श्रेय जाते. दिव्या यादव (अष्टपैलू), श्रद्धा कदम (चढाई), सुप्रिया म्हस्के (पकड) यांनी अमरहिंदकडून कडवी लढत देऊन देखील संघाला पराभवाची चव चाखावी लागली. याची चुटपुट त्यांना देखील लागून गेली असेल.
या स्पर्धेतील उपांत्य पराभूत दोन्ही संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.१,०००/- देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेती सर्वोत्कृष्ट चढाई व पकड ही दोन्ही पारितोषिके अमरहिंदच्या खेळाडूंनी पटकाविली. श्रद्धा कदम ठरली सर्वोत्तम चढाईची खेळाडू, तर सुप्रिया म्हस्के ठरली सर्वोत्तम पकडीची खेळाडू.
दोघींना प्रत्येकी रोख रु. १,०००/-देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अरुण दुधवाडकर, नगरसेविका अरुंधती दुधवडकर, विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, श्रीमती जयश्री बाल्लीकर, कबड्डी संघटक दिगंबर शिरवाडकर, निरीक्षक शरद कालांगण यांच्या उपस्थितीत पार पडला.