प्रो कबड्डीचा पाचवा मोसम हा जरी तीन महिने चालला तरी शेवटच्या लेगमधील शेवटच्या सामन्यापर्यंत गुणतालिकेतील फेरबद्ल होत होते. यावरून आपल्याला हे समजते की हा मोसम किती अटीतटीचा ठरला आहे. या मोसमात अनेक खेळाडूंनी आपल्या संघाला विजयी रथावर चढवले. रेडर्सने गाजवलेल्या या मोसमात अनेक अष्टपैलू कबड्डीपटू आणि डिफेंडर्सनी आपल्या खेळाची छाप सोडली.
ही आहे महासपोर्ट्सची प्रो कबड्डी ५ ची ड्रीम टीम.
१. प्रदीप नरवाल (पटणा पायरेट्स) सेन्टर
या मोसमातीलच नाही तर प्रो कबड्डीच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी या वर्षी पटणाच्या या कर्णधाराने केली आहे. एका मोसमात २००, ३००, आणि ३५० रेड गुण मिळवणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. तसेच एका सामन्यात सर्वाधिक म्हणजेच ३४ रेड गुण मिळवून त्याने प्रो कबड्डीच्या इतिहासातील एका सामन्यात सर्वाधिक रेड गुणांचा विक्रमही आपल्या नावे केला आहे. त्यामुळेच प्रदीप शिवाय या मोसमातील ड्रीम टीम कधीच पूर्ण होऊ शकत नाही. या संघात त्याला प्रमुख रेडरची जबाबदारी देण्यात आली आहे आणि तोच सेन्टरला खेळणार आहे.
२. सुरजीत सिंग (बेंगाल वॉरियर्स) राइट कव्हर
या मोसमात बेंगाल वॉरियर्स प्ले-ऑफ पर्यंत मजल मारू शकले याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्याचा कर्णधार सुरजीत सिंग. या वर्षी बंगालचा संघ प्रामुख्याने त्यांच्या रेडर्सवर अवलंबून होता. डिफेन्समध्ये सुरजीत शिवाय एकही अनुभवी डिफेंडर नव्हता. पण सुरजितने डिफेन्सची सर्व जबाबदारी स्वीकारत संघाला विजय मिळवून दिले. सुरजीत हा बंगालच्या संघात राईट कव्हर म्हणून खेळायचा आणि या संघात त्याची जागा तीच असेल. सुरजीत सारखा कव्हर जर संघात असेल तर कोणताच रेडर डिफेन्समध्ये जास्त आत जाणार नाही. सुरजितने या मोसमात ७६ टॅकल गुण मिळवले आहेत आणि सर्वाधिक टॅकल गुण मिळवणाऱ्या डिफेंडरच्या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
३. परवेश भेसवाल (गुजरात फॉरचूनजायंट्स) लेफ्ट कव्हर
या मोसमात गुजरातच्या संघाचा डिफेन्स हा सर्वात परिपूर्ण डिफेन्स मानला जात होता. त्याचे प्रमुख कारण म्हणजे दोन इराणी डिफेंडर पण त्याच्या बरोबरच परवेश भेसवाल या भारतीय डिफेंडरनेही चांगली कामगिरी केली. मागील मोसमात परवेशने फक्त ३ सामने खेळले होते. परंतु या वर्षी गुजरातकडून त्याने सर्व २४ सामने खेळले. या मोसमात त्याने एकूण ४८ टॅकल गुण मिळवले. लेफ्ट कव्हर म्हणून त्याने गुजरातकडून खेळताना प्रदीप नरवालसारख्या अफलातून रेडरला साखळी सामन्यात रोखून धरले होते.
४. मनिंदर सिंग (बेंगाल वॉरियर्स) राईट इन
या मोसमात बेंगाल वॉरियर्सचा कर्णधार जरी सुरजीत सिंग एक डिफेंडर असला तरी त्यांचा संघ संपूर्णपणे त्यांच्या रेडर्सवर आवलंबून होता. या वर्षी बंगालने जांग कुन ली ला कायम ठेवले होते पण त्याचा फॉर्म काही मागील मोसमांसारखा दिसला नाही. त्यामुळे संघासाठी रेडमध्ये गुण मिळवण्याची जबाबदारी मनिंदर सिंगवर पडली. मनिंदर सिंग पहिल्या मोसमानंतर पहिल्यांदाच प्रो कबड्डीच्या मॅटवर उतरत होता. त्याच्या या मोसमातील कामगिरी बघून असे अजिबात वाटत नाही की त्याने मागील ३ मोसम खेळलेले नाहीत. २१ सामन्यात त्याने १९० रेड गुण मिळवले आहेत. या संघातील तो एकमेव राईट रेडर आहे.
५. अजय ठाकूर (तामिल थलाईवाज) लेफ्ट इन
तामिल थलाईवाज या संघासाठी हा पदार्पणाचा मोसम निराशेचा ठरला आहे. त्यांच्या संघाला झोन बीमध्ये शेवटच्या स्थानी समाधान मानावे लागले आहे. त्यांचा कर्णधार अजय ठाकूरने मात्र आपला विश्वचषकातील फॉर्म कायम राखत तामिळसाठी रेडमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की भारताने या वर्षी झालेल्या कबड्डीचा विश्वचषक जिंकला, त्या विजयाचा शिल्पकार अजय ठाकूर होता. यावर्षी सर्वाधिक रेड गुण मिळवण्याऱ्या रेडर्सच्या यादीत अजय २२२गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ठाकूरने तामिल थलाईवाज संघाचे नेतृत्वही केले आहे. ड्रीम टीमसाठी या संघात कर्णधार पदासाठी तो एक प्रबळ दावेदार होता पण त्याला कर्णधारपद देण्यात आले नाही.
६. अबुझार मीघानी (गुजरात फॉरचूनजायंट्स) राईट कॉर्नर
गुजरात संघाचा डिफेन्स हा या मोसमातील एक सर्वोत्तम डिफेन्सपैकी एक होता, कारण त्यामध्ये स्टार इराणियन डिफेंडर फाझल अत्राचली होता. त्याचाच इराणियन साथीदार म्हणजेच अबुझार मीघानीचा त्याचा हा प्रो कबड्डीचा पहिलाच मोसम होता. बहुतेक त्यामुळेच सर्व रेडर्सचे लक्ष फाझलकडे असताना अबुझार बाजी मारून गेला. या वर्षी अबुझारने गुजरातकडून खेळताना राइट कॉर्नर ही जागा सांभाळली. त्याने पर्दपणाच्या मोसमातच गुजरातकडून खेळताना २४ सामन्यात ६५ गुण मिळवले. सर्वाधिक टॅकल गुणांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.
७. सुरेंदर नाडा कर्णधार (हरयाणा स्टीलर्स) लेफ्ट कॉर्नर
प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात ४ नवीन संघाचा समावेश कारण्यात आला. त्यातील एक संघ म्हणजे हरयाणा स्टीलर्स. या संघाचा ढाचा अनुभवी डिफेंडर आणि युवा रेडर. युवा रेडर्सने तर या संघासाठी चांगली कामगिरी केली आणि संघाला झोन ए मध्ये पहिल्या तीन संघात आणले. सुरेंदर नाडा आणि मोहित चिल्लर या अनुभवी डिफेंडरची जोडीही या संघात होती. पण मोहित या मोसमात लयीत दिसला नाही पण सुरेंदरने त्याची कमी संघाला भासू दिली नाही. पहिल्या पाच सामन्यात नाडाने सलग हाय ५ मिळवले होते. त्यामुळेच सुरेंदर नाडा या संघात लेफ्ट कॉर्नरची जबाबदारी सांभाळत आहे. त्याच बरोबर सुरेंदर नाडाच्या या मोसमातील नेतृत्व गुण ही सर्वानी पहिले. अटीतटीच्या सामन्यात त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे.