भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने भारताच्या स्वातंत्र्य दिनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी एक उत्तम कर्णधार होता, त्याच्या निर्णयामुळे अनेकदा सर्वांना आश्चर्य वाटले आहे. त्याला एक हुशार क्रिकेटर मानले जायचे. त्याच्या कारकिर्दीतील अशा बर्याच घटना आहेत ज्या लोकांना आजही आश्चर्यचकित करतात. धोनी जगातील एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीचे सर्व चषक जिंकले आहेत.
पण शनिवारी, १५ ऑगस्टला अचानक त्याने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. धोनीने ते योग्य केले असे अनेकांचे मत आहे, तर काहींचे मत होते की अजून थोडेदिवस त्याने खेळायला हवे होते. आजच्या या खास लेखात धोनीने निवृत्ती का घ्यायला नको होती त्या ५ कारणांबद्दल जाणून घेऊ.
भारतीय संघाचा यष्टिरक्षकाचा शोध अजून पूर्ण झाला नाही
धोनी संघातील एक महत्वपूर्ण खेळाडू होताच पण एक चांगला यष्टीरक्षक होता. त्याने पदार्पणापासून भारतीय संघाच्या यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे. अशावेळी तो मागील १ वर्ष क्रिकेट खेळत नसताना भारतीय संघाने यष्टीरक्षक म्हणून काही पर्यांयाचा शोध घेतला परंतु अजूनही धोनीप्रमाणे एक चांगला यष्टीरक्षक तयार होण्याची भारताला प्रतिक्षा आहे.
आतापर्यंत टी-२० विश्वचषकाचा विचार केला तर पंत आणि धोनी हेच सर्वोत्तम पर्याय होते. तसेच मागील काही सामन्यात केएल राहुल यष्टिरक्षण करताना दिसला. तरी पंत आणि राहुलच्या यष्टीरक्षणात थोड्याफार सुधारणा कराव्या लागतील, ज्या अनुभवानुसार होण्याची शक्यता आहे.
जरी पंतबद्दल विचार केला तर तो धोनीच्या उपस्थितीत तयार होत होता. इंग्लंडमधील विश्वचषकातही धोनी पंतला बऱ्याच गोष्टी शिकवताना दिसला होता. त्यामुळे कदाचीत आणखी थोडेदिवस धोनीच्या उपस्थितीत या युवा यष्टीरक्षकांनी वेळ घालवला असता तर कदाचीत भारतीय संघाला फायदा झाला असता.
फिनिशर्सची कमतरता भारतीय संघाला जाणवेल
शेवटच्या षटकांत धोनीमध्ये चेंडूला सीमेबाहेर पाठवण्याची क्षमता आहे. परंतु असे फारच कमी क्रिकेटपटू सध्या भारतीय संघामध्ये आहेत. तसेच धोनीमध्ये शेवटच्या काही षटकात कधी मधल्या फळीतील तर कधी तळातल्या फलंदाजांना घेऊन भारताची धावसंख्या वाढवण्याचे कौशल्य होते. धोनीला धावफलक हलता ठेवता येत होता. तसेच अनेकदा त्याने शेवटच्या काही षटकात शानदार फलंदाजी करत सामन्याचा निकाल भारताच्या बाजूने पालटला आहे. त्यामुळे त्याला एक चांगला फिनिशर म्हणूनही नावाजले गेले.
कदाचित यामुळेच वेस्ट इंडिजच्या इयान बिसापने असे म्हटले आहे की, जर शेवटच्या षटकात १५ धावा हव्या असतील आणि फलंदाजीस धोनी असले, तर दबाव धोनीवर नाही तर गोलंदाजावर असेल.
पण आता धोनीने निवृत्ती घेतली आहे आणि ही जबाबदारी आता भारतीय संघात पार कोण पाडणार हा प्रश्न आहे. भारताकडे हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत हे पर्याय आहेत. परंतु दे अजूनही युवा असून त्यांना अनुभवाची गरज आहे. अशात धोनी जर भारतीय संघात असता तर कदाचीत भारतीय संघाला डाव सावरण्याची आणि मधल्या आणि तळातल्या फलंदाजांमध्ये ताळमेळ साधण्यासाठी मदत झाली असती.
डीआरएस घेताना येईल धोनीची आठवण
यष्ट्यांमागे धोनीची चालाखी फक्त झेल, यष्टिचित किंवा धावबादपर्यंत मर्यादित नव्हती. तर डीआरएस घेण्यासही तो माहिर होता. म्हणून समालोचक आकाश चोप्रा यांनी डीआरएसला धोनी रिव्ह्यू सिस्टमला संबोधले होते.
डीआरएस हा खेळाचा एक भाग आहे, जो योग्य प्रकारच्या वापराने सामन्याचे चित्र देखील बदलू शकते. अशा वेळी जेव्हा जेव्हा भारतीय संघाला डीआरएसची आवश्यकता असते तेव्हा धोनीची आठवण नक्की होईल. म्हणूनच धोनीने अद्याप निवृत्ती जाहीर करु नये असे अनेकांना वाटते.
धोनी म्हणजे गोलंदाजांसाठी होता एक वरदान-
धोनी मैदानात असणे म्हणजे गोलंदाजाना एक वरदान मिळाल्यासारखे होते. जेव्हा जेव्हा फलंदाज भारतीय गोलंदाजांवर अधिराज्य गाजवत असत, तेव्हा धोनी गोलंदाजांना सल्ला देत असायचा. तो फलंदाजांचे अचूक निरिक्षण करायचा आणि त्यानुसार तो गोलंदाजांना सूचना देत असे. धोनीने अनेक युवा खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे.
धोनीच्या मार्गदर्शखाली जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्यासह अनेक खेळाडू तयार झाले. अलीकडच्या काळात धोनीने दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर या नव्या गोलंदाजांकडून सर्वोत्कृष्ट कामगिरी करून घेतली. परिणामी, चेन्नई सुपर किंग्ज देखील आयपीएल २०१८ चा विजेता बनला होता. अनेकदा तो गोलंदाजांना सल्ला देताना स्टंप माईकमधून ऐकू आले आहे.
धोनीची ही गुणवत्ता गोलंदाज तसेच भारतीय संघासाठीही फलदायी ठरली होती. त्यामुळे आगामी काळात धोनीची कमतरता नक्कीच जाणवेल; विशेषत: गोलंदाजांना.
दडपणाखाली खेळण्याची क्षमता
संपूर्ण जगाला हे ठाऊक आहे की धोनीकडे दबावामध्ये खेळण्याची अद्भुत क्षमता आहे. एमएस धोनी जगातील ‘बेस्ट फिनिशर्स’ आहे.
यावेळी भारतीय संघात मोजकेच असे फलंदाज आहेत जे दडपणाखाली आपला सर्वोत्तम खेळ दाखवू शकतात. धोनीची सर्वात उत्तम गुणवत्ता म्हणजे कितीही दडपण असले तरी तो शांत राहुन परिस्थितीचे आकलन करतो आणि त्यानुसार खेळ करतो.
त्याची ही गुणवत्ता अनेकदा भारतीय संघासाठी उपयोगी ठरली आहे. तसेच तो या गुणवत्तमुळे समोरच्या खेळाडूलाही शांत रहाण्यास मदत करतो. त्यामुळे भारतीय संघाला दबावाच्या क्षणी धोनीची आठवण होईल. त्यामुळे कदाचीत अनेकांना वाटते की त्याने निदान टी२० विश्वचषकाचा विचार करता आणखी थोडा काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये थांबायला हवे होते.