ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (AUS vs ENG) यांच्यात सुरू असलेल्या ऍशेस मालिका २०२१ (Ashesh Series 2021) मध्ये यजमानांनी १-० ने आघाडी घेतली आहे. ब्रिसबेनवरील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने ९ विकेट्सने विजय मिळवला होता. त्यानंतर उभय संघांमध्ये ऍडलेड येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवसाखेर (१८ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने २८२ धावांची आघाडी घेतली आहे. या सामन्यादरम्यान आपल्या शानदार फलंदाजी आणि गोलंदाजी प्रदर्शनासह ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या अजून एका गोष्टीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
ऍडलेड कसोटी (Adelaide Test) च्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू काळ्या रंगाचा आर्म बँड घालून मैदानावर उतरले होते. या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे प्रतिस्पर्धी इंग्लंडने असेच आर्म बँड घातले होते. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी नक्की काळे आर्मबँड का बांधले असावेत? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सहसा कोणत्या व्यक्तीच्या सन्मानार्थ किंवा कोणत्या गोष्टीप्रती विरोध दर्शवण्यासाठी खेळाडू काळा आर्म बँड बांधून मैदानात उतरत असतात. मात्र ऍडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी काळे आर्म बँड बांधण्यामागचे कारण ऑस्ट्रेलियाच्या नॉर्थ वेस्ट टास्मानियामध्ये झालेली दुर्दैवी जम्पिंग कास्टल (Jumping Castle) घटना होती.
या दुर्घटनेत बुधवारी (१६ डिसेंबर) जम्पिंग कास्टलमध्ये फिरत असलेली बरेचशी लहान मुले वेगाने आलेल्या वाऱ्याचा शिकार बनले आणि १० मीटर इतक्या उंचावरून खाली उडून पडल्याने ५ चिमुकल्यांचा मृत्यूही झाला आहे. तसेच काही ५-६ वयोवर्षे असलेली मुले दुखापतग्रस्त झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर काहींची स्थिती गंभीर आहेत. आपल्या प्राथमिक शाळेचा शेवटचा दिवस असल्याने जल्लोष साजरा करण्यासाठी ही मुले इथे आली होती. परंतु अचानक आलेल्या जोराच्या वाऱ्यामुळे ते या दुर्घटनेचा शिकार बनले आहेत.
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, ऍडलेडवरील गुलाबी चेंडू कसोटी सामनाही ऑस्ट्रेलियाच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात मार्नस लॅब्यूशानेचे शतक आणि डेविड वॉर्नर (९५ धावा) व स्टिव्ह स्मिथ (९३ धावा) यांच्या मोठ्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ४७४ धावांचे आव्हान दिले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ २३६ धावांवर सर्वबाद झाला होता. त्यानंतर तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने १ बाद ४५ धावा केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटला स्थान नाहीच! आता आयसीसी म्हणतेय…
न्यूझीलंडच्या ३४ वर्षीय गोलंदाजाने केली तरूणांना लाजवेल अशी कामगिरी; ३.५ षटकात मिळवले ‘इतके’ बळी