दुलीप ट्रॉफी 2024 चा पहिला सामना भारत अ आणि भारत ब यांच्यात बंगळुरू येथे खेळला जात आहे. दुसऱ्या दिवशी हा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचलाय.
भारत ब संघानं पहिल्या डावात 321 धावा केल्या. मुशीर खाननं 181 धावांची जबरदस्त खेळी केली. प्रत्युत्तरात, भारत अ संघानं दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 35 षटकांत 2 गडी गमावून 134 धावा केल्या आहेत. भारत अ संघ अजूनही 187 धावांनी मागे आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत रियान पराग 27 आणि केएल राहुल 23 धावांसह खेळत आहेत.
तत्पूर्वी, भारत ब नं कालच्या 202/7 च्या स्कोअरपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. मुशीर खाननं काल आपला डाव जिथे संपवला होता, तिथूनच आज सुरू केला. तो घाईघाईत कोणताही चुकीचा शॉट खेळून बाद झाला नाही. मुशीर खाननं 373 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीनं 181 धावा केल्या. त्यानं खालच्या फळीतील नवदीप सैनीसह 8व्या विकेटसाठी 205 धावांची जबरदस्त भागीदारी केली.
एकेकाळी 94 धावांत 7 विकेट्स गमावलेल्या भारत ब संघानं 321 धावा केल्या. नवदीप सैनीनं 144 चेंडूत 8 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं 56 धावा केल्या. भारत अ संघाकडून आकाश दीपनं सर्वाधिक 4 बळी घेतले. आवेश खान आणि खलील अहमद यांनाही 2-2 बळी मिळाले.
प्रत्युत्तरात, फलंदाजीला आलेल्या भारत अ संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. संघाचे दोन्ही सलामी फलंदाज 66 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. कर्णधार शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी पहिल्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. परंतु त्यानंतर दोन्ही खेळाडू झटपट बाद झाले. मयंक अग्रवालनं 45 चेंडूत 36 तर शुबमन गिलनं 43 चेंडूत 25 धावा केल्या. नवदीप सैनीनं दोन्ही बळी घेतले आहेत.
हेही वाचा –
“भारतीय संघात सध्या दर्जेदार फिरकीपटू नाहीत”, वीरेंद्र सेहवागचे वादग्रस्त विधान!
भारत विरुद्ध बांगलादेश मालिका कधीपासून सुरू होणार? कोणत्या चॅनलवर दिसतील लाईव्ह सामने?
मुशीर खानचं नाव दुलीप ट्रॉफीच्या इतिहासात अजरामर, नवदीप सैनीसोबत मिळून रचला अद्भुत रेकॉर्ड!