भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाच्या पाच स्पर्धांपैकी एक असलेल्या दुलीप ट्रॉफीला २०१७-१८ मोसमात बीसीसीआयने आयोजित न करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन वर्षात वार्षिक वेळापत्रकात तेवढी महत्वपूर्ण न राहिलेल्या या स्पर्धेला या वर्षीच्या मोसमासाठी बाय बाय करण्यात आले आहे.
पाचपैकी एक
रणजी ट्रॉफी, दुलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी या बीसीसीआय आयोजित करत असलेल्या देशांतर्गत क्रिकेटमधील महत्वाच्या स्पर्धा आहेत. दुलीप ट्रॉफीची सुरवात १९६१-६२ च्या मोसमापासून होत असून आजपर्यंत ५६ वर्ष ही स्पर्धा खेळवली गेली आहे.
बीसीसीआय काय म्हणते?
बीसीसीआयचे सचिव अमिताभ चौधरी यांनी याबद्दल शुक्रवारी घोषणा केली. ६ ऑक्टोबरपासून रणजी ट्रॉफीपासून या मोसमाची सुरुवात होत असून शेवट देवधर ट्रॉफीने १८ मार्चला होणार आहे. प्रत्येक स्पर्धेत फक्त २ आठवड्यांची विश्रांती आहे.
इतिहास:
या स्पर्धेचा फॉरमॅट अनेकवेळा बदलला आहे. कधी झोनमध्ये तर कधी एलिट विभागात तर कधी लीग अशा प्रकारात ही स्पर्धा झाली आहे. काही वेळा या स्पर्धेत परदेशी संघही सहभागी झाले आहेत. गेल्या मोसमात ही स्पर्धा इंडिया रेड, ग्रीन आणि ब्लु संघात झाली. २०१५-१६चा मोसम वगळता ही स्पर्धा १९६१-६२ पासून दरवर्षीं खेळवण्यात येत होती. गेल्या वर्षी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लु ही स्पर्धा जिंकली होती.