प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या झिम आफ्रो टी10 लीग स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (29 जुलै) खेळला गेला. हरारे येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात डर्बन कलंदर्स व जोहान्सबर्ग बफेलोज हे संघ आमनेसामने आलेले. अखेरच्या षटकापर्यंत ताणल्या गेलेल्या या सामन्यात अखेर डर्बन कलंदर्सने 8 गडी राखून विजय संपादन केला. हजरतुल्लाह झझाई अंतिम सामन्याचा मानकरी ठरला.
हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेल्या या सामन्यात डर्बन कलंदर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. जो बर्ग बफेलोज संघाचे सलामीवीर मोहम्मद हाफिज व टॉम बॅंटन यांनी 3.5 षटकात 53 धावा फटकावल्या. दोघांनी अनुक्रमे 32 व 36 धावा केल्या. त्यानंतर युसुफ पठाण याने 25 व रवी बोपारा याने 22 धावा करत संघाला 127 धावांपर्यंत मजल मारून दिली.
या धावांचा पाठलाग करताना डर्बन संघाला टीम सायफर्टने 14 चेंडूवर 30 धावा करत चांगली सुरुवात दिली. त्यानंतर आलेल्या फ्लेचर याने 11 चेंडूंमध्ये 29 धावा केल्या. फ्लेचर बाद झाल्यानंतर डर्बन सामन्यात माघारेल असे वाटत होते. कारण, सलामीवीर झझाई हा चेंडूला ठीक पद्धतीने मारू शकत नव्हता. शेनवारी याला एक षटकार मारल्यानंतर त्याने नूर अहमद याच्या एका षटकात दोन षटकार वसुल करत सामना डर्बनच्या बाजूने केला. नवव्या षटकात आसिफ अलीने मुझुरबानीला 2 षटकार मारून अखेरच्या षटकात फक्त 7 धावा बाकी ठेवल्या. अखेर झझाईने विजयी चौकार मारत डर्बनला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले.
(Durban Qalanders Won First ZIM Afro T10 League)