जयदत्त क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कुमार गट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दुर्गामाता स्पोर्ट्सने एस एस जी फाउंडेशनचा ३७-३४ असा पराभव करीत रोख रु.एकवीस हजार (₹ २१,०००/-) व “स्वप्नसाफल्य चषक” आपल्या नावे केला.
दुर्गामाता स्पोर्ट्सचा प्रथमेश पालांडे ठरला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू. त्याला आकर्षक भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. मुंबई शहर कुमार गट निवड चाचणी स्पर्धेत ह्याच दोन संघात लढत झाली असता दुर्गामाताने बाजी मारली होती. पुन्हा एकदा बाजी मारत कुमार गटात आपणच किंग हेच दुर्गामाताने सिद्ध केले.
उपविजेत्या एस एस जी ला चषक व रोख रु.अकरा हजार (₹ ११,०००/-)वर समाधान मानावे लागले. मुंबईतील दोन तुल्यबळ संघात झालेली ही लढत शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठावेधक ठरली.पहिल्या डावात दोन्ही संघाने एक-एक लोणची नोंद करीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्गामाताने या डावात मिळविलेले ५ बोनस गुण त्यांच्या कामी आले. त्यामुळे विश्रांतीला दुर्गामाताकडे २१-१८ अशी महत्वपूर्ण आघाडी होती.दुसऱ्या डावात देखील दुर्गामाताने बोनस रेषा पार करण्यावर भर देत ७ बोनस गुणांची कमाई केली. एस एस जी ला पूर्ण डावात अवघा १ बोनस गुण मिळविता आला. हा बोनस गुणांतील फरकच शेवटी या विजयात महत्वाचा ठरला.
करण कदमचा झंजावाती अष्टपैलू खेळ त्याला प्रथमेश पालांडेने चढाईत गडी टिपत दिलेली उत्कृष्ट साथ यामुळे दुर्गामाताला हा विजय मिळविता आला. एस एस जी च्या पंकज मोहिते, ओमकार पोरे यांनी कडवी लढत दिली. पण बोनस गुण मिळविण्यात आलेले अपयश एस एस जी च्या पराभवास कारणीभूत ठरले.
या अगोदर झालेल्या उपांत्य सामन्यात दुर्गामाताने श्रीराम संघाला ३७-१५ असे, तर एस एस जी फाऊंडेशनने सह्याद्री मित्र मंडळाचा ४३-३९ असे पराभूत करीत अंतिम फेरीत धडक दिली होती. सह्याद्री मित्र मंडळाच्या प्रणय रुपयेला स्पर्धेतील उत्कृष्ट पकडीचा, तर एस एस जी च्या पंकज मोहितेला स्पर्धेतील उत्कृष्ट चढाईचा खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. दोघांनाही प्रत्येकी आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.या स्पर्धेचे बक्षीस वितरण यशवंत किल्लेदार, महेश सावंत, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू संजय वडार, शेखर भगत व स्पर्धा निरीक्षक रविंद्र देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला.
संक्षिप्त निकाल
१) दुर्गामाता स्पोर्टस क्लब, मुंबई
२) एस एस जी फाउंडेशन, मुंबई
३) श्री राम, पालघर
४) सह्याद्री क्रीडा मंडळ, उपनगर
उत्कृष्ट चढाईपटू: पंकज मोहीते (एस एस जी)
उत्कृष्ट पकडपटू: प्रणय रुपये (सह्याद्री)
मालिकवीर: प्रथमेश पालांडे