मुंबई खिलाडीज संघाचा अष्टपैलू खेळाडू दुर्वेश साळुंखे पुण्यात सुरू असलेल्या अल्टीमेट खो खो स्पर्धेत खेळण्याचा पुरेपूर आनंद लुटत आहे. तसेच, अल्टीमेट खो खो लीगच्या पुढच्या मौसमात अधिकाधिक युवा खेळाडू सामील होतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला.
मुंबई येथील शारीरिक शिक्षण विभागात शिक्षक असलेल्या दुर्वेशला त्याच्या विद्यार्थ्यांकडून सातत्याने प्रोत्साहनपर संदेश मिळत असतात. अल्टीमेट खो खो लीग मधल्या सामन्यांमध्ये खेळताना मला माझे विद्यार्थी टेलिव्हिजनवरून पाहत असतात आणि मला मेसेज करत असतात असे सांगून दुर्वेश म्हणाला की, “त्यांच्यापैकी अनेकांना खो खो हा खेळ शिकण्याची ईच्छा आहे. लीग संपल्यावर मी जेव्हा परत जाईल तेव्हा, ते खेळाडू माझ्याकडे येतील. त्यांना मी खो खो शिकवेन,प्रशिक्षण देईन आणि ते भविष्यात अल्टीमेट खो खो लीगमध्ये निश्चितच खेळू शकतील.”
मुंबई संघातील अव्वल आक्रमक असलेल्या दुर्वेशने क्रीडा क्षेत्रातील आपली कारकीर्द ऍथलेटिक्सपासून सुरू केली. मात्र पुरेशा सुविधांअभावी तो खो खो कडे वळला आणि याच काळात आपल्या कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी धडपडत असताना अल्टीमेट खो खो स्पर्धेच्या माध्यमातून रोज टेलिव्हिजनवर झळकण्याची संधी आता त्याला मिळाली आहे.
माझे मित्र, कुटुंबीय, नातेवाईक पाहत असतात आणि फोनवरून मला त्याबद्दल अनेक गोष्टी रंगवून सांगत असतात. तेव्हा मला अतिशय आनंद होतो आणि अभिमानही वाटतो. माझ्या कुटुंबियांनी माझ्या सुरुवातीच्या धडपडीच्या काळात मला जो पाठिंबा दिला त्याची परतफेड त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक प्रमाणात मी करू शकेल, अशी मला आशा वाटते.
मुंबई संघ स्पर्धेच्या पहिल्या टप्पात चांगली कामगिरी करू शकला नसला, तरी उत्तरार्धात जोरदार पुनरागमन करेल, असा विश्वास दुर्वेशने व्यक्त केला. तसेच, अपयशी ठरत असताना ही सहकाऱ्यांनी पाठिंबा दिल्यामुळे यश मिळू शकेल हे त्याने सांगितले.
खो खो हा सांघिक खेळ असून मुंबई संघाकडे उत्तम आक्रमक आहेत.परंतु आमचे संरक्षण पहिल्या टप्प्यात कमी पडले. मात्र गेल्या दोन सामन्यांपासून आमचे संरक्षक उत्तम कामगिरी करताना आक्रमण मात्र परिणामकारक ठरेनासे झाले आहे.गजाननची भूमिका संरक्षणात महत्त्वाची असल्याचे सांगून दुर्वेश म्हणाला की, तो प्रतिस्पर्ध्यांच्या आक्रमणाचा वेग कमी करतो.नंतर अविक सिंगा आणि पाठोपाठ मी उतरल्यावर प्रतिस्पर्ध्यांचे आक्रमण चांगलेच रोखले जाते.श्रीजेश आणि विजय हे आमचे अनुभवी खेळाडू असून युवा खेळाडू त्यांना शक्य तितका पाठिंबा देत असतात.आक्रमणातही त्यांना बळी घेण्यासाठी साहाय्य करणे हे आमचे मुख्य काम असते.
मुंबई खिलाडीज संघाचे मुख्य प्रशिक्षक राजेंद्र साप्ते यांच्यासह काम करण्याचा आनंद वाटत असल्याचे दुर्वेशने नमूद केले. साप्ते यांनी भारतीय संघासोबत काम केले आहे. त्यांना प्रचंड अनुभव आहे आणि मैदानात यश मिळवण्यासाठी त्यांच्या सूचनांचे बिनचूक पालन करणे महत्त्वाचे असते असे सांगून दुर्वेश शेवटी म्हणाला की, जेव्हा कधी आम्ही अपेक्षित कामगिरी करत नाही तेव्हा ते आम्हाला तसे स्पष्ट सांगतात. त्यामुळे आम्ही कामगिरीत सुधारणा करू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तानचा मास्टर स्ट्रोक! टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय, वाचा प्लेइंग11
‘हिटमॅनचा सिक्स का बाबरचा क्लास?’ दुबईतील खेळपट्टी कोणाला करणार मदत, वाचा सविस्तर
‘भावा लवकर लग्न उरकून टाक!’, पाहा रोहितने काय दिला बाबर आझमला सल्ला