पाचव्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत मुख्य ड्रॉ मध्ये एकेरीत डच टेनिस स्टार खेळाडू टॅलन ग्रीक्सपूर याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीचा 4-6, 7-5, 6-3 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अतीतटीच्या रोमांचकारी ठरलेल्या अंतिम लढतीत 26 वर्षीय जागतिक क्रमवारीत 95व्या स्थानी असलेल्या टॅलन ग्रीक्सपूर याने जागतिक क्रमवारीत 60व्या स्थानी असलेल्या बेंजामिन बोन्झीचे आव्हान 2तास 16 मिनिटात मोडीत काढले.
अंतिम फेरीचा सामना पाहण्यासाठी 3500हुन अधिक पुणेकरांनी आपली उपस्थिती लावली होती. रंगतदार चुरशीच्या ठरलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला दोन्ही खेळाडूंनी तोडीस तोड खेळ करत नवव्या गेमपर्यंत आपापल्या सर्व्हिस राखल्या. अखेर 10व्या गेममध्ये बोन्झीने वेगवान खेळ करत टॅलनची सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट 6-4 असा जिंकून विजेतेपदाच्या दिशेने एक पाऊल पडूहीटाकले . दुसऱ्या सेटमध्ये पिछाडीवर असलेल्या टॅलनने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत 11व्या गेममध्ये बोन्झीची सर्व्हिस रोखली व हा सेट 7-5 अशा फरकाने जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले.
तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये पहिल्या दोन गेममध्ये आपापल्या सर्व्हिस राखल्या. पण तिसऱ्या गेममध्ये बोन्झीने सर्व्हिस करताना डबल फॉल्ट केला व याच संधीचा फायदा घेत टॅलनने त्याची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 3-1 अशी आघाडी घेतली. त्यानंतर बोन्झीला अखेरपर्यंत सूर गवसलाच नाही. टॅलनने नवव्या गेममध्ये बोन्झीची पुन्हा सर्व्हिस भेदली व विजेतेपदाच्या करंडकावर आपले नाव कोरले.
दक्षिण आशियातील एकमेव एटीपी 250 स्पर्धा सूरू असलेल्या या स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आणि महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने करण्यात आले आहे. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईजने जागतिक स्तरावर व्यवस्थापन केलेल्या टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेला टाटा समूहाचे प्रायोजकत्व लाभले आहे.
हेरीत बेल्जीयमच्या सँडर गिले व जोरन व्लिगेन या चौथ्या मानांकित जोडीने भारताच्या जीवन नेद्दुचेझियन व एन श्रीराम बालाजी यांचा 6-4, 6-4असा पराभव करून विजेतेपद संपादन केले. तर, भारताच्या जीवन नेद्दुचेझियन व एन श्रीराम बालाजी या जोडीने उपविजेतेपद पटकावले.बेल्जीयमच्या सँडर गिले व जोरन व्लिगेन या जोडीने याआधी 2021मध्ये सिंगापूर येथील स्पर्धेत विजेतेपद पटकावले होते.
यावर्षीच्या स्पर्धेत अव्वल100मधील 17 मानांकित खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला होता. ज्यामध्ये माजी ग्रँड स्लॅम चॅम्पियन मरीन चिलीच आणि गतवर्षीचा उपविजेता एमिल रुसूंव्होरी यांचा समावेश होता. दुहेरीच्या ड्रॉमध्ये माजी जागतिक क्रमवारीत अव्वल मानांकित राजीव राम आणि जॉय सॅलिस्बरी या जोडीसह भारतीय टेनिसपटू रोहन बोपण्णा यांचाही सहभाग होता. स्पर्धेतील विजेत्या नेदरलँडच्या टॅलन ग्रीक्सपूरला डॉलर 97,760आणि 250एटीपी गुण, तर उपविजेत्या फ्रान्सच्या बेंजामिन बोन्झीला डॉलर 57,025 आणि 150 एटीपी गुण देण्यात आले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण टाटा मोटर्सचे गिरीश वाघ, क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, एआयटीएचे अध्यक्ष अनिल खन्ना, एमएसएलटीएचे अध्यक्ष भरत ओझा, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, एआयटीएचे सहसचिव व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे सचिव सुंदर अय्यर, अमृता फडणवीस, टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेच्या संयोजन समितीचे सचिव प्रविण दराडे, डॉ. परिणय फुके, पल्लवी दराडे यांच्या हस्ते करण्यात आले.
(Dutch star Griekspoor clinches his maiden ATP Tour title at 5th Tata Open Maharashtra)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ओडिशा एफसी पुन्हा विजयीपथावर, ईस्ट बंगाल एफसीवर 3-1 अशी मात
टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत सँडर गिले-जोरन व्लिगेन जोडीला विजेतेपद; भारताच्या जीवन नेदडूचेझियन-एन श्रीराम बालाजी यांना उपविजेतेपद