सांघिक खेळ हे फुटबॉलचे स्वरुप कायम असते. अशावेळी वैयक्तिक कामगिरी काही वेळा फारशी निर्णायक ठरत नाही. गोल करण्याचा मुद्दा येतो तेव्हा एक स्ट्रायकर प्रसिद्धीझोतात येतो, पण असे वैयक्तिक प्रयत्न संपूर्ण संघात ताकद निर्माण करण्यासाठी कधीच पुरेसे नसतात.
गेल्या मोसमात प्रामुख्याने फेरॅन कोरोमीनास याच्या भरपूर गोलांमुळे एफसी गोवाने बाद फेरीत प्रवेश केला, पण त्याचवेळी मॅन्यूएल लँझरॉत तसेच त्याच्याशी जमलेल्या भागिदारीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. यावेळी नॉर्थइस्ट युनायटेड एफसीने प्रथमच बाद फेरी गाठली आहे. यात बार्थोलोम्यू ओगबेचे याने प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे वळविला असला तरी जोडीला फेडेरीको गॅलेगो नसता तर त्याची पिछेहाट झाली असती.
मोसमात याआधी नॉर्थइस्टचे प्रशिक्षक एल्को शात्तोरी म्हणाले होते की, बार्थोलोम्यू गोल करतो आहे तोपर्यंत मी आनंदात आहे. तुम्ही इतर संघांबरोबर तुलना केलीत तर आम्ही केवळ बार्थोलोम्यू आणि फेडेरीको यांच्यावर अवलंबून आहोत. त्यामुळे मी याचे बरेचसे श्रेय स्वतःला देतो.
ही जोडी पूर्ण मोसमात अद्वितीय ठरली आहे. आता महत्त्वाच्या टप्यात त्यांच्याकडून अशीच कामगिरी अपेक्षित असेल. पीएसजी आणि रेयाल वॅल्लादॉलीदकडून खेळलेला ओगबेचे यंदा नॉर्थइस्टमध्ये दाखल झाला आणि तो आघाडी फळीत आरामात स्थिरावला. 17 सामन्यांत 12 गोल करीत त्याने संघाची धुरा पेलली. केवळ कोरोमीनास (15) यालाच त्याच्यापेक्षा जास्त गोल करता आले आहेत. यंदा सामन्यागणिक सर्वाधिक शॉट््स (4.24) आणि सामन्यागणिक टार्गेटवर सर्वाधिक शॉट््स (1.53) अशी त्याची आकडेवारी कोरोमीनासनंतर दुसऱ्या क्रमांकाची आहे. भारतात पदार्पण केलेल्या या खेळाडूची ही कामगिरी प्रभावी ठरते.
प्रतीस्पर्धी संघांसाठी ओगबेचे हाच धोकादायक ठरला आहे आणि बहुतांश वेळा तसेच घडल आहे. चेंडू पुढे ठेवत तो धावू शकतो, तो भेदक चाल रचू शकतो, तो लांब अंतरावरून प्रयत्न करू शकतो. नायजेरीयाच्या या खेळाडूकडील असे वैविध्यपूर्ण कौशल्य नैसर्गिक आहे. वेगवेगळ्या संघांकडून वेगवेगळ्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव असल्यामुळे भारतीय फुटबॉल त्याच्यासाठी सोपा ठरला.
नॉर्थइस्ट संघातील पर्यायांचा अभाव भरून काढण्यासाठी ओगबेचे याचे वैयक्तिक कौशल्य पुरेसे नव्हते. त्यासाठी संघाला आघाडी फळीत ओगबेचेला साथ देऊ शकेल असा जोडीदार हवा होता. पहिल्या काही सामन्यांतच गॅलेगोची क्षमता सर्वांनाच दिसली. धुर्त पासिंग व हालचालींमुळे त्याने प्रतिस्पर्धी बचाव फळी जेरीस आणली. त्यामुळे नॉर्थइस्टविरुद्ध बाजी मारण्यासाठी केवळ ओगबेचेवर लक्ष केंद्रीत करणे प्रतिस्पर्ध्यांना जड जाऊ लागले.
गॅलेगोने आतापर्यंत चार गोल आणि पाच अॅसिस्ट अशी कामगिरी केली आहे. 22 पैकी बहुतांश गोलांमध्ये आणि अॅसिस्टमध्ये या जोडीचा वाटा आहे. 22 पैकी 16 गोलांचे श्रेय या जोडीला जाते.
शात्तोरी यांचा संघ बाद फेरीतील पहिल्या टप्यातील सामन्यात सात मार्च रोजी बेंगळुरू एफसीविरुद्द त्यांच्या घरच्या मैदानावर खेळेल. हा मोसम नॉर्थइस्टकरीता चढउतारांचा ठरला आहे. अशावेळी मोसमात सर्वाधिक सातत्य राखलेल्या बेंगळुरूविरुद्ध शात्तोरी यांची मदार पुन्हा एकदा प्रभावी कामगिरीसाठी ओगबेचे-गॅलेगो जोडीवर असेल.