पुणे – महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत सोळाव्या दिवशी पहिल्या लढतीत अथर्व काळे(६५धावा) याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाचा २१ धावांनी पराभव करून पाचवा विजय मिळवला. `
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेत रत्नागिरी जेट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचं निर्णय घेतला. ईगल नाशिक टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५बाद २०८धावांचे आव्हान उभे केले. विशेष म्हणजे नाशिक टायटन्स संघाने तिसऱ्यांदा २००धावांचा टप्पा पार केला. सलामीचा फलंदाज मंदार भंडारी(७)ला साहिल छुरीने झेल बाद करून ईगल नाशिक टायटन्सला पहिला धक्का दिला. अर्शिनने ३९चेंडूत ५१धावा करून आपले अर्धशतक साजरे केले. त्यात त्याने ७चौकर व १ षटकार मारला. अर्शिन व साहिल पारख(२२) या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी २१चेंडूत ४३ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. साहिल पारख २२ धावांवर आक्रमक फटका मारताना बाद झाला. त्यानंतर अथर्व काळे व अर्शिन कुलकर्णी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४३चेंडूत ७८धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. अथर्व काळेने ३३चेंडूत ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली. अथर्वने ३चौकार व ६उत्तुंग षटकार मारले. अथर्व व अर्शिन हे दोघेही बाद झाल्यावर रणजीत निकम नाबाद २०, कौशल तांबे नाबाद १२ धावा काढून संघाला २०८ धावांचे आव्हान उभे करून दिले.
२०८ धावांचा पाठलाग करताना रत्नागिरी जेट्स संघाला २०षटकात ८बाद १८७धावापर्यंत मजल मारता आली. रत्नागिरी संघाने आज आपल्या सलामी जोडीत बदल केला होता. पण तो यशस्वी झाला नाही. ईगल नाशिक टायटन्सच्या मुकेश चौधरीने पहिल्याच षटकात धीरज फटांगरे(०), तुषार श्रीवास्तव(०) यांना खाते न उघडताच स्वस्तात परत पाठवले. त्यानंतर कर्णधार अझीम काझी(२६धावा) व दिव्यांग हिंगणेकर(३२धावा) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६चेंडूत ४१धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण नाशिकच्या रेहान खानने अझीम काझीला तर, अक्षय वाईकरने दिव्यांग हिंगणेकरला बाद केले. त्यानंतरदेखील रत्नागिरीचे फलंदाज एकापाठोपाठ बाद होत होते. दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या साहिल छुरीने आक्रमक खेळी करत अवघ्या १६ चेंडूत ५३धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. त्यात त्याने ५चौकार व ५ टोलेजंग षटकार ठोकून मैदान दणाणून सोडले. साहिलचे अर्धशतक हे एमपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. त्याला योगेश चव्हाणने नाबाद २३ धावा काढून साथ दिली. या जोडीने नवव्या विकेटसाठी २५ चेंडूत ६८धावाची भागीदारी करून संघाला १८७धावापर्यंत मजल मारून दिली. ईगल नाशिक टायटन्सकडून प्रशांत सोळंकी(३-३१)ने तीन गडी बाद केले, तर अक्षय वाईकर(२-३९), मुकेश चौधरी(२-२३) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक
ईगल नाशिक टायटन्स: २०षटकात ५बाद २०८धावा(अथर्व काळे ६५(३३,३x४,६x६), अर्शिन कुलकर्णी ५१(३९,७x४,१x६), धनराज शिंदे २३, साहिल पारख २२, रणजीत निकम नाबाद २०, साहिल छुरी १-३१, निकित धुमाळ १-३४) वि.वि.रत्नागिरी जेट्स: २०षटकात ८बाद १८७धावा(साहिल छुरी नाबाद ५३(१६,५x४,५x६), दिव्यांग हिंगणेकर ३२(२८,२x४,१x६), अझीम काझी २६, योगेश चव्हाण नाबाद २३, निखिल नाईक १७, प्रशांत सोळंकी ३-३१, अक्षय वाईकर २-३९, मुकेश चौधरी २-२३); सामनावीर – अथर्व काळे.