पुणे । मोटोक्रॉस या शब्दाला किंवा माउंटन बाइकिंगला आपण किती ओळखतो यावर बऱ्याच जणांना शंका असेल. आज चक्क २०१७ मध्ये सुद्धा किती जण नक्की हो म्हणतील यावर शंका आहे, पण हाच प्रश्न जर तुम्ही १९८० किंवा १९९० साली विचारला असता तर कदाचित तुम्हाला शेकडो हात आणि आवाज ‘होय’ असे म्हणत वर दिसले असते.
पुण्यासारख्या शहरात क्रिकेट सोडून लोक हा खेळ कसे काही बघतील असा जर सवाल आपल्या मनात येत असेल तर जुने पेपर आणि आपल्या खेळप्रेमी नातेवाईकांचे फोटो चाळून बघा, मोटोक्रॉस, डर्ट बाइकिंगचे फोटो तुम्हाला नक्की सापडतील.
८० आणि ९० च्या दशकात पुणे आणि आसपासच्या परिसरात मोटोक्रॉस स्पर्धा इतक्या लोकप्रिय होत्या की ज्याची तुलना सध्याच्या आयपीएल स्पर्धेशी जरी केली तरी त्यात मोटोक्रॉसची सरशी होईल. मात्र मागील काही वर्षात मोटोक्रॉसचे वेड पुण्यात तरी कमी झाले आहे.
परंतु इशान लोखंडे आणि त्यांच्यासारखे काही क्रीडाप्रेमी पुन्हा या खेळाला संजीवनी मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याशी महा स्पोर्ट्सने साधलेल्या खास संवादातून ह्या खेळाचा इतिहास आणि सद्यस्तिथीबद्दल उकल झाली. या खेळाची लोकप्रियता आपल्या कल्पनेपलीकडे होती असे इशान म्हणाला. स्वतः ९० च्या दशकात हा खेळ नेहरू स्टेडियमवर पाहायला जायचा आणि लोकांची गर्दी आणि उत्साह बघून तो भारावून जायचा.
मुळात टेनिसपटू म्हणून सुरवात करणारा इशान लोखंडे माऊंटन बाइकिंगकडे कसा वळला यात सुद्धा एक गोष्ट दडली आहे. संपूर्ण परिवार टेनिस क्षेत्रात अतिशय सक्रिय, मुंबईच्या एमएसएलटीए सेंटरचे नाव आपल्या आजोबांच्या नावावरून (जी. ए. रानडे) असणे याहून काय मोठी गोष्ट असेल. तसेच आई रोहिणी लोखंडे या देखील टेनिस क्षेत्रातील एक नामवंत व्यक्ती.
इतका मोठा वारसा असताना खेळ सोडून इतर क्षेत्रात जाणं हा मुद्दा काही उद्भवलाच नाही. जसं बाइकिंगकडे लक्ष गेलं तसंच टेनिसमधलं लक्ष थोडं कमी होत गेलं. जवळपासच्या टेकडीवर बाइकिंगला जाण्यासाठी टेनिस क्लास बुडवणे अश्या गोष्टी सुरु झाल्या. हाच प्रवास २००४ साली आर एक्स १०० वरून हळू हळू माउंटन बाइकिंगकडे वळाला आणि मग परत मागे वळून त्याने पाहिलेच नाही.
पुण्यात २००० सालापासून प्रतिवर्षी बाइकिंगच्या राष्ट्रीय स्पर्धा होतात ज्यामध्ये इशान स्वतः २००९ पर्यंत स्पर्धेत सहभागी होत असे. पण इतक्या मोठ्या पातळीची स्पर्धा पुण्यात होत असताना लोकांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार होत नसल्यामुळे या स्पर्धांकडे आणि त्यातल्या स्पर्धकांकडे दुर्लक्ष होत गेलं. इशान पुढे जाऊन लंडनमध्ये देखील रेस करून आला व परत आल्यावर इथे स्पर्धेत सहभागी होण्याऐवजी वेगळी स्पर्धा सुरु केली.
या खेळाला म्हणावा तसा न्याय मिळायला हवा या हेतूने इशानने ही स्पर्धा सुरु केली. पुण्याचे या स्पर्धेशी नाते पुन्हा एकदा उलगडण्यासाठी हे ठिकाण निवडणे अनिवार्य होते.
हा खेळ पुन्हा लोकांपुढे आणणे हे मोठे आव्हान होते. अजूनही ऐंशी आणि नव्वदीच्या दशकाची बरोबरी करणे अवघड आहे. त्याकाळी खेळाला जागा आणि खेळ उभा करण्यासाठी पैसा या गोष्टी काही प्रमाणात सोप्या होत्या, मात्र आज चित्र वेगळे आहे. पण आता स्पर्धेला चार वर्ष पूर्ण झाल्यावर थोडं सोपं देखील झालं आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही नामांकित व्यक्ती या स्पर्धेशी जोडल्या गेल्यामुळे कष्ट थोडे कमी झाले आहेत.
या खेळाच्या प्रसारात आणखी एक मोठी अडचण म्हणजे या खेळासाठी लागणाऱ्या बाईक्स. या बाईक्स खूप महागडया असतात. त्यांची अंदाजे किंमत ३-४ लाखांच्या पुढे असते. त्यामुळे त्या घेणे सर्वांच्या खिशाला परवडणारे नसते. त्यापेक्षाही महत्वाची बाब म्हणजे या बाईक्स परदेशातून मागवाव्या लागतात. त्यावर खूप मोठा कर बसतो. कधी कधी तो कर त्या बाईकच्या किमतीच्या दुप्पट देखील असतो. त्यामुळे या खेळाकडे वळावे तरी कसे असा अनेकांना प्रश्न पडतो.
हा खेळ जोपासणारी मुले मुली हे एक तर गरीब किंवा मध्यम वर्गीय कुटुंबातून बहुतांश वेळा येतात. हा खेळ बघायला जरी मजा वाटत असली तरी खेळायला मोठी हिम्मत आणि जिगर लागते. हे खेळाडू खूप जिद्दी आणि स्वप्रेरित असतात. त्यांच्या या मेहनतीला फळ मिळावे व सोबत प्रसिद्धी मिळाली या हेतूने ही लीग सुरु केली असे इशान म्हणाला.
मोटोक्रॉसला आता कुठे भारतात एक खेळ म्हणून मान्यता मिळत आहे. त्यामुळे यामध्ये सरकारने लक्ष घालून खेळाच्या प्रसारासाठी आणि वाढीसाठी विदेशातून येणाऱ्या या खेळांच्या बाईक्सवरील कर कमी करायला हवा आहे. या खेळाशी निगडीत सर्व बाबींवर विवध अंगाने चर्चा आणि बदल होणे गरजेचे आहे.
“या खेळाला पुन्हा लोकप्रिय करण्यासाठी या खेळातील आपल्या मातीतील हिरे शोधावे लागतील. त्यांना प्रोत्साहीत करावे लागेल, त्यांच्या कौशल्यांना खत पाणी घालावे लागेल तेव्हा ते घडतील. “अशी प्रतिक्रिया इशान लोखंडेने दिली. यासाठी मुळाशी जाऊन काम करावे लागेल असे तो म्हणाला.
For any suggestions and articles like these get in touch with us at [email protected]