इंग्लंड आणि भारत यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत अखेरचा सामना रविवारी (१७ जुलै) खेळला जाणार आहे. मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर हा सामना होईल. दोन्ही संघांनी पहिल्या दोनपैकी प्रत्येकी एक सामना जिंकल्याने या सामन्याला अंतिम सामन्याचे वलय प्राप्त झाले आहे. या सामन्यासाठी वातावरण, खेळपट्टी आणि दोन्ही संघांची संभावित अंतिम अकरा खेळाडूंची यादी काय असेल यावर आपण नजर टाकूया.
ओव्हल येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने दहा गडी राखून दणदणीत विजय मिळवलेला. मात्र, लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने त्या पराभवाचे उट्टे काढत भारतीय संघाला १०० धावांनी पराभूत केले. त्यामुळे अखेरचा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करताना दिसतील. वनडे मालिकेआधी झालेली टी२० मालिका भारताने २-१ अशी जिंकलेली.
कसे असेल वातावरण?
रविवारी मँचेस्टरमधील तापमान कमाल २९ आणि किमान १८ अंश सेल्सिअस राहील. पावसाची शक्यता अत्यंत कमी असली तरी दिवसभर वातावरणात काहीसा थंडपणा दिसून येईल. तसेच ढगाळ वातावरणात संपूर्ण मॅच खेळली जाण्याची देखील शक्यता आहे.
असे असेल खेळपट्टीचे स्वरूप
मागील काही वर्षांपासून मँचेस्टरच्या खेळपट्टीवर मोठ्या प्रमाणात ३०० पेक्षा अधिक धावा निघाल्या आहेत. त्यामुळे या सामन्यातही मोठ्या धावसंख्या पहायला मिळू शकतात. पारंपारिकरित्या खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते. तसेच वातावरण काहीसे ढगाळ असल्याने प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वेगवान गोलंदाजांना याचा मोठा फायदा मिळू शकतो.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
इंग्लंड-
जोस बटलर (कर्णधार), जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, क्रेग ओव्हरटन, डेव्हिड विली, रिस टोप्ली, ब्रायडेन कार्स.
भारत-
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल.
महत्त्वाच्या बातम्या-
खराब फॉर्मातील विराट करू लागला ‘राम’ नामाचा जप, अनुष्कासोबतचा फोटो व्हायरल
सचिनचा रेकॉर्ड आता मोहम्मद शमी तोडणार, कर्णधार रोहितकडेही विक्रम रचण्याची संधी