भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्यात आले आहेत. हा सामना २ सप्टेंबरपासून लंडनच्या द ओव्हल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. चौथ्या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल केले गेले आहेत. या सामन्यासाठी ज्या दोन भारतीय खेळाडूंना संघातून बाहेर करण्यात आले आहे, त्या दोघांचाही २ आणि ३ सप्टेंबरला वाढदिवस होता.
चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने त्यांच्या गोलंदाजी आक्रमणात दोन बदल केले आहेत. संघाने इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीला संघातून बाहेर करून त्यांच्या जागेवर शार्दुल ठाकुर आणि उमेश यादव यांना संघात सामील केले आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा २ सप्टेंबरला वाढदिवस असतो. तसेच ३ सप्टेंबरला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा वाढदिवस होता. अशा खास दिनी दमदार प्रदर्शन करत स्वत:सह आपल्या क्रिकेटप्रेमींसाठी हा दिवस अजून विशेष बनवण्याची संधी त्यांना मिळाली नाही. कारण चौथ्या कसोटी सामन्यासाठी या दोन खेळाडूंना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी संघाबाहेर करण्यात आले होते.
यापूर्वी नुकत्याच झालेल्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान युजवेंद्र चहलसोबतही असेच घडले होते. चहलचा वाढदिवस २३ जुलैला असतो आणि त्याच्या दिवशी भारत आणि श्रीलंका यांच्यात मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना खेळला गेला होता आणि त्याला या सामन्यासाठी संघात संधी मिळाली नव्हती. क्रिकेटमध्ये असे प्रसंग फार कमी वेळा पाहायला मिळतात.
दरम्यान चौथ्या कसोटी सामन्यामध्ये दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ २९० पर्यंत धावसंख्या करू शकला. यासह इंग्लंडने पहिल्या डावात भारतावर ९९ धावांची आघाडी मिळवली होती. यामध्ये ऑली पोप आणि क्रिस वोक्स यांचा मोठा वाटा राहिला. दोघांनीही अर्धशतकी खेळी केल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने त्यांच्या दुसऱ्या डावाला सुरुवात केली आहे. रोहित शर्मा २० आणि केएल राहूल २२ धावांसह मैदानात खेळत आहेत. भारतीय संघाची धावसंख्या ४३ धावा झाली असून संघ अजून ५६ धावांनी पिछाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
4th Test Live: तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात; रोहित शर्मा-केएल राहुलची जोडी उतरली मैदानात
युएई टप्प्यासाठी DC च्या नेतृत्त्वाचे चित्र स्पष्ट; पंत की अय्यर, कोणाला मिळणार ‘गुड न्यूज’?
सलामी जोडीच्या अभेद्य भागिदारीनंतरही भारताचा मार्ग खडतर, विजयासाठी २५०ची आघाडीही अपुरी!