भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत चांगली सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत झालेल्या २ कसोटी सामन्यांमध्ये पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडला १५१ धावांनी पराभूत केले. यासह भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे.
तसेच, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट पासून लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा असणार आहे. भारतीय संघ मिळालेल्या आघाडीला कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असेल, तर इंग्लंडचा संघ या सामन्याला जिंकून मालिकेत बरोबरी करण्याच्या तयारीत असेल.
दरम्यान, तिसरा कसोटी सामना भारताचा युवा यष्टिरक्षक फलंदाज रिषभ पंत आणि कर्णधार विराट कोहलीसाठी वैयक्तिक पातळीवर महत्त्वाचा असणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात रिषभ पंतला त्याचाच ३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. तर विराट कोहलीला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव स्मिथचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
पंत करु शकतो मोठा विक्रम
पंतने २०१८ साली कसोटी क्रिकेटमध्ये ८ सामन्यांत १६ षटकार मारले होते. पंतचे हे षटकार भारतातील कोणत्याही यष्टिरक्षक फलंदाजाकडून एका वर्षात कसोटी सामन्यांमध्ये मारण्यात आलेले सगळ्यात जास्त षटकार होते. पंतने यावर्षी आत्तापर्यंत ९ कसोटीत १५ षटकार लगावले आहेत. जर पंतने तिसऱ्या कसोटी सामन्यात आणखीन २ षटकार मारल्यास त्याचा ३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघेल.
यासह पंत पुन्हा एकदा एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज बनेल. याच्याआधी हा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावे होता. धोनीने २००६ साली कसोटी क्रिकेटमध्ये १२ षटकार मारले होते. त्यानंतर २०१८ साली पंतने १६ षटकार खेचत धोनीला मागे टाकले.
यावर्षाची एकूण कामगिरी लक्षात घेता, २०२१ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या एकूण खेळाडूंमध्येही पंत अव्वल स्थानी आहे. त्याच्यापाठोपाठ भारताचा रोहित शर्मा आणि वेस्ट इंडिजचा काईल मेअर्स हे संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघांनीही प्रत्येकी ९ षटकार यावर्षी कसोटीत मारले आहेत.
विराटलाही विक्रम करण्याची संधी
दुसरीकडे, गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या विराट कोहलीला देखील एक विक्रम करण्याची संधी आहे. कोहली गेल्या ३ वर्षांपासून म्हणजे २०१८ पासून इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामध्ये पहिल्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू स्टीव्ह स्मिथ आहे.
कोहली आणि स्मिथ यांच्यात केवळ ३० धावांचा फरक आहे. गेल्या ३ वर्षांत कोहलीने इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात ८२७ धावा केल्या आहेत. तर स्मिथने ८५७ धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटी सामन्यात कोहलीने ३१ धावा केल्यास कोहली स्मिथच्या या विक्रमला मोडीत काढू शकतो. यासह कोहली गेल्या ३ वर्षात इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल.
रुटकडेही विक्रमाची संधी
तसेच, इंग्लंडचा कर्णधार जो रूट देखील तिसऱ्या कसोटी सामन्यात आपल्या नावे एक विक्रम करू शकतो. रूटने २०१८ पासून आतापर्यंत २९९८ धावा केल्या आहेत. यासह तो गेल्या ३ वर्षांमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. रूटने तिसऱ्या कसोटी सामन्यात ३ धावा केल्यास. गेल्या ३ वर्षात कसोटीमध्ये ३,००० धावा करणारा तो जगातला एकमेव फलंदाज बनू शकतो.
यानंतर कसोटीमध्ये गेल्या ३ वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकावर बेन स्टोक्स आहे. ज्याने १९५३ धावा केल्या आहेत. तिसर्या क्रमांकावर केन विलियम्सन (१८९२ धावा), चौथ्या क्रमांकावर मार्नस लॅब्यूशेन (१८८५ धावा) तर १७०२ धावांसह चेतेश्वर पुजारा पाचव्या क्रमांकावर आहे.
महत्वाच्या बातम्या –
–अमेरिकेचा संभाव्य क्रिकेट संघ, ‘हे’ दोन भारतीय असू शकतात सलामीवीर
–शुभमंगल सावधान! सनरायझर्स हैदराबादचा ‘हा’ गोलंदाज चढला बोहल्यावर, दाक्षिणात्य वेशभूषेतील फोटो व्हायरल
–शानदार बाबर! दमदार अर्धशतकासह पाकिस्तानच्या कर्णधाराचा आणखी एक विक्रम