इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना क्रिकेटचा मक्का म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर खेळला गेला. या सामन्यात यजमान इंग्लंडनं 1 डाव आणि 114 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडचा महान वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संस्मरणीय निरोप घेतला. अँडरसननं या कसोटी सामन्यात पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 3 विकेट घेतल्या. त्यानं एकूण 704 कसोटी विकेट्ससह आपली कारकीर्द संपवली.
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी (12 जुलै) वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात 136 धावांवर ऑलआऊट झाला. तत्पूर्वी, इंग्लंडनं पहिल्या डावात 371 धावा करत 250 धावांची आघाडी मिळवली होती. वेस्ट इंडिजनं पहिल्या डावात केवळ 121 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या विजयाचा हिरो राहिला वेगवान गोलंदाज गस ॲटकिन्सन. ॲटकिन्सननं आपल्या पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 5 बळी घेतले. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसनला त्याच्या सहकारी खेळाडूंनी ‘गार्ड ऑफ ऑनर’ दिला.
41 वर्षीय जेम्स अँडरसननं 2003 मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हापासून तो 188 कसोटी सामने खेळला. फक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर 200 कसोटी सामने आहेत. अँडरसन हा 700 कसोटी बळींचा टप्पा गाठणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज आहे. यावर्षी भारताविरुद्धच्या धर्मशाला कसोटीत कुलदीप यादवला बाद करून अँडरसननं 700 बळी पूर्ण केले होते.
जेम्स अँडरसननं 194 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर 269 विकेट्स आहेत. त्यानं 19 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या. अँडरसननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1627 धावा काढल्या असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक अर्धशतक (81 धावा) आहे.
सर्वाधिक कसोटी विकेट घेणारे खेळाडू
(1) मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010) : 133 कसोटी – 800 विकेट्स
(2) शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी – 708 विकेट्स
(3) जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2024): 188 कसोटी – 704 विकेट्स
(4) अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी – 619 विकेट्स
(5) स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023): 167 कसोटी – 604 विकेट
(6) ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007): 124 कसोटी – 563 विकेट
कसोटी क्रिकेटमध्ये जेम्स अँडरसन
सामने – 188
विकेट – 704
सरासरी – 26.45
इकॉनॉमी – 2.79
एका डावात 5 बळी – 32
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी – 7/42
चेंडू टाकले – 40,037
धावा काढल्या – 1353
सर्वोत्कृष्ट खेळी – 81
महत्त्वाच्या बातम्या –
जिद्द असेल तर काहीच अशक्य नाही! वयाच्या 58व्या वर्षी ऑलिम्पिक पदार्पण करणार ही महिला खेळाडू
3 खेळाडू जे भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनू शकतात, गंभीरनं सुचवलं या विदेशी खेळाडूचं नाव
जेम्स अँडरसनने रचला इतिहास, हा विक्रम करणारा ठरला जगातील पहिला वेगवान गोलंदाज